घरच्या गरिबीवर मात करत सीएच्या परीक्षेत देशातून पहिला येण्याचा मान मिळविणाऱ्या प्रेमा जयकुमार या २३ वर्षांच्या तरूणीला इंडियन बँकेने थेट व्यवस्थापक पद देऊ केले आहे. एखाद्या सार्वजनिक बँकेतून एखाद्या उमेदवाराला इतके मोठे अधिकारीपद देऊ करण्याची ही दुर्मिळ घटना आहे. अर्थात भारतातील हुशार आणि होतकरू तरूणांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून डॉलर्समध्ये वेतन दिले जात असताना प्रेमा एका सार्वजनिक बँकेत काम करणे पसंत करेल का, असा प्रश्न आहे.
प्रेमाचे वडिल रिक्षाचालक आहेत. महिना अवघे १५ हजार रूपये उत्पन्न असलेल्या प्रेमाने सीएच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात मिळविलेले यश म्हणूनच कौतुकास्पद आहे. तिच्यासोबत सीएची परीक्षा दिलेल्या तिच्या भावानेही पहिल्याच प्रयत्नात सीए होण्याची कामगिरी केली आहे. इंडियन बँकेचे विपोन मल्होत्रा यांनी प्रेमाला गुरूवारी नियुक्ती पत्र दिले. बँकेचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. पण, प्रशिक्षणानंतर प्रेमाने आपल्या पसंतीनुसार बँकेच्या कुठल्याही कार्यालयात रूजू व्हावे, असा प्रस्ताव त्यांनी प्रेमापुढे ठेवला आहे.
राज्यपालांकडून शाबासकी
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सीएच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविणाऱ्या प्रेमावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षांव होतो आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी प्रेमाला एक लाख रूपयांचे पारितोषिक देऊन तिचा गौरव केला आहे. प्रेमाच्या यशाविषयी कळल्यानंतर राज्यपालांनी तिला कुटुंबियांसह राजभवन येथे बोलावून तिचा सत्कार केला. प्रेमाचे कुटंबिय व तिच्या महाविद्यालयाचे प्राचार्य यावेळी उपस्थित होते.