पाठय़पुस्तकांमध्ये वारंवार होणाऱ्या चुकांच्या पाश्र्वभूमीवर आतापर्यंत कधी नव्हे ते दहावीचे विद्यार्थी विक्रेत्यांकडे पाठय़ुपस्तकांच्या २०१५च्या सुधारित आवृत्तीची मागणी करू लागले आहेत. विशेषत: क्लासचालकांकडून सुधारित आवृत्तीच विकत घेण्याचा आग्रह विद्यार्थ्यांना केला जात असल्याने २०१४मध्ये छापलेल्या पाठय़पुस्तकांना आता खरेदीदारच उरलेले नाहीत. त्यामुळे, गेल्या वर्षीच्या पाठय़पुस्तकांचा साठा काय करायचा, असा प्रश्न आता वितरक आणि विक्रेत्यांना पडू लागला आहे. एकीकडे सुधारित आवृत्तीच विकत घेण्याचा विद्यार्थ्यांचा आग्रह आणि दुसरीकडे २०१५ची सुधारित अशी म्हणून काही आवृत्ती बालभारतीने न छापल्याने बाजारात दहावीची पाठय़पुस्तके असूनही त्यांची कृत्रिम चणचण भासू लागली आहे.
पाठय़पुस्तकांबाबत सुधारित आवृत्तीच हवी, असा आग्रह कधीच नव्हता. परंतु, गेल्या काही वर्षांत पाठय़पुस्तकात होणाऱ्या चुका तसेच एकदा पुस्तक प्रकाशित झाल्यानंतरही त्यात वारंवार केले जाणारे बदल यामुळे कधी नव्हे ते पाठय़पुस्तकांच्या सुधारित म्हणजे २०१५च्या छापील आवृत्तीची मागणी विक्रेत्यांकडे होऊ लागली आहे. पण पाठय़पुस्तकांबाबत सुधारित आवृत्ती असा काही प्रकार कधीच नसल्याने पुस्तकांचे विक्रेते आणि वितरकही गोंधळून गेले आहेत. कारण सध्या कुठल्याच विक्रेत्याकडे दहावीची २०१५ची सुधारित आवृत्ती नाही.
विक्रेत्यांकडे जी पुस्तके विक्रीकरिता उपलब्ध आहेत ती २०१४ची आहेत. त्यामुळे, गिऱ्हाईके येऊनही त्यांना परत पाठवावे लागत आहे, असे गिरगावच्या ‘हळबे एजन्सी’चे अमोल खरे यांनी सांगितले. ‘दहावीच्या पाठय़पुस्तकांची बहुतांश विक्री एप्रिल-मे महिन्यात होते. त्यामुळे आम्ही दहावीच्या पुस्तकांचे किमान १०० ते २०० संच ठेवत असतो. परंतु, आता मागणीच नसल्याने केवळ १० संच मागवीत आहोत. काही मुले तर विकत घेऊन गेलेली पुस्तके क्लासमध्ये चालणार नाही म्हणून सांगितल्याने परत आणून देत आहेत,’ असे ‘भारत बुक डेपो’चे मालक शशिकांत आवटी यांनी सांगितले.
मुळात दहावीच्या पाठय़पुस्तकांची २०१५ची म्हणून अशी काही आवृत्ती बालभारतीने छापलेलीच नाही. कारण जोपर्यंत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पाठय़पुस्तकात काही बदल करून त्यानुसार पुस्तके छापावी, असे आम्हाला कळवीत नाही तोपर्यंत आम्ही पुस्तके छापत नाही, असे बालभारतीतील सूत्रांनी सांगितले. तसेच बालभारती दरवर्षी जितकी मागणी असते त्याच्या पाच टक्के अधिकची पाठय़पुस्तके छापते. त्यामुळे, त्यांची विक्री झाल्याशिवाय नवीन पाठय़पुस्तकांची छपाई होत नाही, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.
‘इतिहास आणि भूगोलाच्या पाठय़पुस्तकांमधील चुकांच्या पाश्र्वभूमीवर मंडळाने दहावीच्या पाठय़पुस्तकांचा आढावा गेल्या वर्षी घेतला होता. त्यांनी जर दुरुस्त्या करून दिल्या तर आम्ही सुधारित पुस्तके छापू. पण या संदर्भात मंडळाशीच बोलणे उचित राहील,’ असे सांगून ‘महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक मंडळा’चे (बालभारती) संचालक चंद्रमणी बोरकर यांनी या संदर्भात अधिक माहिती देण्यास नकार दिला. मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

*क्लासचालकांकडून २०१५ साठीच्या सुधारित पुस्तकांची मागणी
*बालभारतीकडून २०१४ च्या पुस्तकांत सुधारणाच नाहीत
*दुकानदारांकडे जुनाच साठा पडून
*विद्याथी मात्र संभ्रमात