व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये आता पदवी अभ्यासक्रमही सुरू होणार असून विद्यापीठ अनुदान आयोगाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी महाविद्यालयांकडे प्रस्ताव मागितले आहेत. ‘बॅचलर इन व्होकेशनल’ (बी.व्होक) अशी पदवी हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाने हे अभ्यासक्रम तयार केले आहेत. एक वर्षांचा पदविका अभ्यासक्रम, २ वर्षांचा उच्च पदविका अभ्यासक्रम आणि ३ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम महाविद्यालये सुरू करू शकतात. पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर अगदी पहिल्या वर्षांमध्ये शिक्षण सोडून दिलेल्या विद्यार्थ्यांनाही रोजगाराची संधी मिळावी, अशी या अभ्यासक्रमाची रचना करणे अपेक्षित आहे.
सात स्तरांमध्ये हा अभ्यासक्रम तयार करता येणार आहे. पहिल्या वर्षांमध्ये पहिल्या पाच स्तरांपर्यंतचा अभ्यासक्रम, दुसऱ्या वर्षांत सहा स्तरापर्यंतचा अभ्यासक्रम आणि पदवीसाठी सातव्या स्तरावरील अभ्यासक्रम अशी या अभ्यासक्रमांची रचना असणार आहे. 
हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आयोगाकडून महाविद्यालयांना १ कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये अभ्यासक्रमासाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी ५० लाख रुपयांचा पहिला टप्पा देण्यात येणार आहे. मात्र, या अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयांनी मूल्यांकनासाठी क्रेडिट पद्धती वापरणे बंधनकारक आहे. 
वाहन उद्योग, माहिती तंत्रज्ञान, मनोरंजन, संप्रेषण, बांधकाम, उपयोजित कला, शेती, विक्री कौशल्ये, पर्यटन, मुद्रण आणि प्रकाशन या व्यवसायांमधील अभ्यासक्रम महाविद्यालयांना सुरू करता येणार आहेत. यामध्ये जवळपास २५ विषयांचे पर्याय आयोगाने उपलब्ध करून दिले आहेत.