९० खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांना पूर्ततेसाठी तीन महिन्यांची मुदत

राज्यातील ३६६ अभियांत्रिकी पदवी महाविद्यालयांपैकी तब्बल ९० खासगी महाविद्यालयांकडे ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद’ (एआयसीटीई) या केंद्रीय नियामक संस्थेने ठरवून दिलेल्या पात्रता निकषांप्रमाणे पुरेशा शैक्षणिक व भौतिक सुविधा नसल्याचे आढळून आले आहे. या संस्थांना तीन महिन्यांच्या आत पात्रता निकषांची पूर्तता करण्याची मुदत देण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या आदेशावरून ‘तंत्रशिक्षण संचालनालया’ने या महाविद्यालयांची झाडाझडती सुरू केली होती. त्यात अनेक महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांच्या तुलनेत पुरेसे शिक्षक, पुस्तके, भौतिक सुविधा आदी गोष्टी आढळून आल्या नाहीत. या सर्व संस्थांना तीन महिन्यांच्या आत या निकषांची पूर्तता करण्यास सांगण्यात आले आहे, असे तंत्रशिक्षण संचालक डॉ. सु. का. महाजन यांनी सांगितले. तीन महिन्यांनंतर आमचे अधिकारी पुन्हा या महाविद्यालयांची तपासणी करतील. त्यानंतरही निकषांची पूर्तता केली नसल्याचे आढळून आल्यास आम्ही कारवाईच्या दृष्टीने विचार करू, असे महाजन यांनी स्पष्ट केले.
पात्रता निकष धाब्यावर बसवून प्रवेश करणाऱ्या आणि लाखो रुपयांचे शुल्क आकारून विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांच्या विरोधात विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी आल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे, संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकीच नव्हे, तर औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी पदवी, व्यवस्थापनशास्त्र आदी महाविद्यालयांची झाडाझडती घेण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले होते. मात्र, संचालनालयाकडे विविध अभ्यासक्रमांच्या सुमारे तीन हजारांहून अधिक व्यावसायिक महाविद्यालयांची तपासणी करण्याकरिता अधिकाऱ्यांची पथके नसल्याने पहिल्या टप्प्यात केवळ अभियांत्रिकी पदवी महाविद्यालयांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ऑक्टोबरमध्ये संचालनालयाच्या अधिकाऱ्यांच्या तपासणी अहवालावरून सुमारे ९० महाविद्यालयांना नोटिसा पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. महाविद्यालयांकडे पुरेसे शिक्षक, पुस्तके, उपाहारगृहाची सुविधा, वर्गखोल्यांची कमतरता आढळून आली होती. त्यामुळे त्यांना आम्ही नोटिसा बजावल्या आहेत, असे महाजन यांनी स्पष्ट केले.

अनेक सरकारी महाविद्यालयांमध्येही सुविधांचा तुटवडा आहे. त्यातून खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील सुमारे ५० टक्के जागा गेली काही वर्षे रिक्त राहत आहेत. विद्यार्थीच प्रवेश घेत नसल्याने महाविद्यालयांना निकषांची पूर्तता करण्याकरिता पुरेसा निधी उपलब्ध होत नाही.
– प्रा. के. एस. बंदी, समन्वयक महाराष्ट्र विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय संघटना

‘अनुभवी शिक्षक मिळत नाहीत’
खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक असतात. मात्र, अनुभवी व ज्येष्ठ शिक्षक मिळत नसल्याने त्या संदर्भातील निकषांची पूर्तता करता येत नाही. प्राध्यापक, सहप्राध्यापक या दर्जाचे शिक्षक मिळविताना अडचणी येतात, असे बंदी यांनी या समस्येचे कारण स्पष्ट करताना सांगितले.