परळच्या ‘नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थे’मधील ‘मास्टर इन लेबर स्टडीज’ (एमएलएस) या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचा ‘सामान्यज्ञान’ विषयाचा पेपर फुटल्याचा आरोप फेटाळून लावताना याबाबत कोणत्याही उमेदवाराने कोणतीही तक्रार केलेली नाही तसेच यासंबंधी कोणतीही माहिती दिलेली नसल्याचा दावा संस्थेने केला आहे. या सगळ्याचा फटका बसलेले उमेदवार मात्र आपल्या दाव्यावर ठाम असून त्यांनी सर्व परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
आता पहिलीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी उपलब्ध करून दिल्या जातात. पण, श्रम विज्ञान संस्थेत उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी तर दूरच; पण प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणांचा तपशीलही जाहीर केला जात नाही. त्याऐवजी केवळ निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाते. हे अन्यायकारक असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. पेपरफुटीच्या प्रकरणातही संस्थेने उत्तरपत्रिका उमेदवारांना उपलब्ध करून दिल्यास ‘दूध का दूध’ होऊन जाईल, असे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे.  
‘उत्तरपत्रिका तर दूरच; पण आम्हाला प्रवेश परीक्षेतील गुणांचा तपशील माहिती करून घ्यायचा झाला तरी ‘माहितीच्या अधिकारा’खाली अर्ज करावा लागतो. तेव्हा कुठे आम्हाला आमच्या परीक्षेचे गुण समजतात,’ अशी तक्रार एका उमेदवाराने केली. या संबंधात संस्थेचे निबंधक ई. के. गटकळ यांना विचारले असता गुणांचा तपशील किंवा उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जात नाही, हे मान्य केले. उत्तरपत्रिका उपलब्ध करून द्यायचा निर्णय लगेचच घेता येणे शक्य नाही. त्यासाठी रितसर प्रक्रियेतून जावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.