व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षाही झाल्या, तरी या अभ्यासक्रमाचे भविष्य अजूनही टांगणीलाच आहे. व्यवस्थापन अभ्यासक्रम हे ‘तंत्रशिक्षणा’त मोडत नसल्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर हे अभ्यासक्रम नक्की कोणत्या संस्थेच्या नियंत्रणाखाली असणार याबाबतचा संभ्रम अजूनही दूर झालेला नाही.
व्यवस्थापन अभ्यासक्रम हे ‘तंत्रशिक्षणा’मध्ये मोडत नसल्याचा निर्णय न्यायालयाने दिला होता. त्यानंतर या अभ्यासक्रमांचे नियंत्रण हे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून काढून विद्यापीठ अनुदान आयोगाकडे देण्यात आले. विद्यापीठ अनुदान आयोगाने व्यवस्थापन अभ्यासक्रमांवर विद्यापीठांनी नियंत्रण ठेवावे असे परिपत्रकही काढले होते. मात्र, त्याबाबत पुढे विद्यापीठांना काहीच सूचना देण्यात आल्या नाहीत. नंतर एका निर्णयामध्ये तंत्रशिक्षण संस्थांवरच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नियंत्रण ठेवू शकत नसल्याचे न्यायालयाने म्हटले. त्यामुळे अभियांत्रिकी, औषधनिर्माण असे सर्वच अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अखत्यारित आले. या अभ्यासक्रमांबाबतची नियमावलीही आयोगाने नुकतीच प्रसिद्ध केली. त्यामध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माण, हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. नव्या नियमावलीमध्ये व्यवस्थापन अभ्यासक्रमांचा समावेश नाही. त्यामुळे विद्यापीठे आणि शिक्षणसंस्था संभ्रमात आहेत.
नव्या शैक्षणिक वर्षांमध्ये व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून सीईटीही घेण्यात आली आहे. मात्र, अजूनही हा अभ्यासक्रम चालवणाऱ्या शिक्षणसंस्थांवर नियंत्रण कुणाचे हे स्पष्ट झालेले नाही. नव्या शैक्षणिक वर्षांमध्ये या अभ्यासक्रमाच्या मान्यतेचे नूतनीकरण कुठे करायचे, त्यासाठीचे शुल्क किती याबाबत संस्था संभ्रमात आहेत.