सुरक्षा अहवाल सादर करण्यासाठी शासनाने दिलेली मुदत उलटून महिना झाल्यावरही सुरक्षा अहवाल सादर न केलेल्या आठ महाविद्यालयांना सोमवार, ३१ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. निवासी डॉक्टरांनी जुलैमध्ये केलेल्या कामबंदनंतर आतापर्यंत सहा वेळा डॉक्टरांवर हल्ले होण्याच्या घटना घडल्या आहेत.
डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यासंदर्भात निवासी डॉक्टरांनी केलेल्या कामबंद आंदोलनानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी राज्यातील सर्व १४ सरकारी महाविद्यालयांना १५ दिवसात सुरक्षा अहवाल तयार करण्याची सूचना १० जुलै रोजी केली होती.
मात्र, आतापर्यंत जेजे, बीजेएमसी पुणे, नायर, लातूर, अंबेजोगाई आणि नांदेड अशा केवळ सहाच वैद्यकीय महाविद्यालयांनी त्यांचा सुरक्षा अहवाल शासनाकडे जमा केला आहे. त्यातच शनिवारी सोलापूर वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ डॉक्टरांवरही हल्ल्याची घटना घडली.
या दरम्यानच्या काळात जेजे मुंबई, बीजेएमसी पुणे, केईएम, औरंगाबाद, यवतमाळ व सोलापूर येथील सरकारी रुग्णालयात डॉक्टरांवर हल्ले झाले. औरंगाबाद येथे गेल्या वर्षभरात डॉक्टरांवर पाच वेळा हल्ले झाले आहेत. मात्र पुणे व जेजेचा अपवाद वगळता इतर कोणत्याही रुग्णालयाकडून अहवाल तयार करण्यात आला नाही. दरम्यान सोलापूरमधील हल्ल्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या कामबंदनंतर तेथील सुरक्षेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांनंतरही अद्याप आठ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांकडून अहवाल सादर न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.