राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांमधील हजारो शिक्षकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे. अधिवेशनापूर्वीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या मागण्यांवर विचार नाही झाला तर हिवाळी अधिवेशनादरम्यान १७ डिसेंबर रोजी नागपुरात मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा कृती समितीचे अध्यक्ष टी. एम. नाईक यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही मागण्या मान्य न झाल्याने पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारतर्फे २००१ मध्ये कायम विनाअनुदान धोरण लागू झाले. त्यानंतर राज्यातील सुमारे २१ हजार शिक्षकांना १३ वर्षांपासून पगारापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांवर वेठबिगारी करण्याची वेळ आली होती. या प्रश्नी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीतर्फे राज्यभरात वेळोवेळी आंदोलने करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या शिक्षकांनी ऐन दिवाळीतच आझाद मदानात आमरण उपोषणास प्रारंभ केला होता. अखेर १० दिवसांनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले होते. मात्र, या कायम विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याबाबत अद्यापही राज्य सरकारकडून हालचाली दिसून न आल्याने येत्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे