भविष्यात मुख्याध्यापक सुट्टीची घंटा वाजवत असल्यास, विज्ञान शिक्षक प्रयोगशाळा स्वच्छ करताना दिसल्यास, भाषा शिक्षक ग्रंथालयातील धूळ झाडताना, तर गणिताचे शिक्षक रोपटय़ांना पाणी देताना दिसल्यास नवल वाटायला नको. राज्याचे सकल उत्पन्न कमी होण्याची पहिली कुऱ्हाड शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर पडणार आहे. शिक्षण खात्यातील वरिष्ठांनी तर घरची कामे करायला आपण नोकर ठेवतो काय, अशी पृच्छा करून शिक्षक नेत्यांना या अनुषंगाने निरुत्तर केले आहे.     
सध्या तुकडीनिहाय कर्मचारी मिळतो. त्यानुसार एका वर्गास एक चपराशी किंवा शिपाई मिळतो. म्हणजे, प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांच्या पाच तुकडय़ा असतील तर पाच शिपाई नेमले जातात, पण शिक्षक हक्क कायद्यान्वये आता तुकडय़ा नव्हे, तर विद्यार्थी संख्येनिहाय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणुका ठरतील. म्हणजे, दोनशे विद्यार्थ्यांंमागे एक चपराशी व एक लिपिक नेमला येईल. या नव्या आकृतीबंधात पाचशे ते हजार विद्यार्थ्यांंमागे केवळ अर्धवेळ ग्रंथपाल नेमला जाऊ शकेल. वेतनेतर अनुदानासोबतच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना ही बाब चांगलीच तापदायक ठरली आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती १९९८ पासून बंद आहे. १६ वर्षांंपासून राज्यभरातील अनेक शाळांमध्ये एक लिपिक व एका शिपायावर कारभार हाकला जात आहे. भरती बंद असल्याने व या दरम्यान अनेक कर्मचारी निवृत्त झाल्याने अशी आपत्ती ओढवलेली असतांनाच या नव्या आकृतीबंधामुळे राज्यभरातील शाळांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया ठप्प होऊ शकते. हजारावर विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांना किमान पुरेसा कर्मचारी तरी मिळेल, पण गरज म्हणून चालविल्या जाणाऱ्या लहान पटसंख्येच्या शाळांमध्ये शिक्षकांवरच अध्यापनबाह्य़ कामे ओढवतील. या भरतीवर निबर्ंध आणण्याचे ठरल्यावर शिक्षक नेत्यांनी शिक्षण संचालक चोक्कालिंगम (पुणे) यांची भेट घेतली, चर्चा झाली, पण उपाय निघाला नाही. प्रशासकीय कर्मचाऱ्यांची कपात, हे स्पष्ट कारण आहे. मात्र, ही बाब नेत्यांच्या गळी उतरवितांना अनाहूत सल्लाही दिला गेला. घरची कामे आपण स्वत:च करतो. त्यासाठी घरगडी ठेवत नाही. त्याचा कुणाला अपमान वाटत नाही. मग शाळा हेही आपले कुटूंब समजून काही कामे करायला काय हरकत आहे, अशी पृच्छा या शिक्षक नेत्यांना करण्यात आल्यावर सगळ्यांच्याच कपाळावर आठय़ा उमटल्या. यापुढे शाळेत पाणी भरणे, प्रयोगशाळा व अन्य कक्षांची सफाई, बागेची देशभाल, समन्वय सुरक्षा, शालोपयोगी सुविधांची देखभाल मुख्याध्यापकांना करावी लागली तर नवल वाटू नये.

शिक्षकेतरावरच कु ऱ्हाड -जगताप
विदर्भ मुख्याध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष सतीश जगताप म्हणाले, नवा आकृतीबंध शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कपात करणारा आहे, पण त्यामुळे शाळेतील कामांचा निपटारा करणे अशक्य ठरेल. विद्यार्थ्यांना प्रत्येक सुविधेचा लाभ देणे शक्य होणार नाही. शिक्षकांकडे अशी कामे सोपविल्यास त्यांच्याकडून चांगल्या अध्यापनाची अपेक्षा कशी करणार, अशी शंका उपस्थित करून जगताप यांनी याप्रकरणी पाठपुरावा करण्याचे सुतोवाच केले. हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला पायबंध घालणार की दिलासा देणार, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.