कंपनी सेक्रेटरी (सीएस)चा ‘एक्झीक्युटिव्ह प्रोग्रॅम’ पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करता येणार असून, एक्झीक्युटिव्ह प्रोग्रॅम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता वेगळे पात्रता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 
सी.एस.चा अभ्यासक्रम फाउंडेशन, एक्झीक्युटिव्ह आणि प्रोफेशनल अशा तीन टप्प्यांमध्ये विभागण्यात आला आहे. प्रत्येक टप्पा पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांला इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय) कडून प्रोग्राम उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत होते. मात्र, यापुढे एक्झीक्युटिव्ह प्रोग्रॅम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘कम्प्लायन्स एक्झीक्युटिव्ह’ म्हणून मान्यता देण्यात येणार आहे. आयसीएसआयच्या अभ्यास मंडळाने याबाबत शासनाकडे प्रस्ताव ठेवला असून त्या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली आहे. डिसेंबर महिनाअखेर पर्यंत यासंबंधी कायद्यामध्येही योग्य त्या सुधारणा केल्या जातील आणि त्यानंतर या नव्या पद्धतीची अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती आयसीएसआयचे अध्यक्ष नासिर अहमद यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना दिली. हा प्रस्ताव अमलात आल्यास एक्झीक्युटिव्ह प्रोग्रॅम पूर्ण केल्यानंतरच विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र, आयसीएसआयचे सदस्यत्व मिळवण्यासाठी सी.एस.चा प्रोफेशनल प्रोग्रॅम आणि त्यानंतरचे व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक ठरणार आहे. सी.एस.च्या तुलनेमध्ये कम्प्लायन्स एक्झीक्युटिव्हच्या कार्यक्षेत्रालाही मर्यादा असणार आहेत.
याबाबत नासिर अहमद म्हणाले, ‘‘देशात मोठय़ा प्रमाणार सीएसची गरज आहे, मात्र दरवर्षी सी.एस.ची परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे छोटय़ा कंपन्यांचे कम्प्लायन्स प्रमाणपत्रांचे काम वेळेवर होत नाही. एक्झीक्युटिव्ह प्रोग्रॅम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘कम्प्लायन्स एक्झीक्युटिव्ह’ म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयामुळे छोटय़ा कंपन्यांवरील कम्प्लायन्स प्रमाणपत्रांच्या कामाचा ताण कमी होणार आहे. त्याचप्रमाणे सी.एस. करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही एक्झीक्युटिव्ह प्रोग्रॅमनंतरच कामाची संधी उपलब्ध होणार आहे.’’