राज्य मंडळाकडूनही आता बहि:स्थ विद्यार्थ्यांसाठी खुल्या शिक्षण व्यवस्थेचा विचार केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवडीचे विषय आणि व्यावसायिक शिक्षणाचे विषय घेऊन परीक्षा देता येणार आहेत. या बाबतचा प्रस्ताव राज्य मंडळाकडून तयार करण्यात येत आहे.
‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलिंग’ च्या धर्तीवर प्रत्येक राज्यात व्यवस्था असावी, असा निर्णय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आणि न्यायालयानेही काही वर्षांपूर्वी दिला होता. जे विद्यार्थी शिक्षणाच्या नियमित प्रवाहात समाविष्ट होऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी वेगळा पर्याय उपलब्ध करून देण्याचा विचार या मागे होता. मात्र गेली अनेक वर्षे राज्य मंडळाकडून ओपन स्कूलिंग किंवा खुल्या शिक्षणव्यवस्थेचा प्रस्ताव पुढे सरकला नाही. आता मात्र ही संकल्पना प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल राज्य मंडळाने उचलले असून खुली शिक्षण पद्धत लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यांत असून तो शासनाकडे पाठवण्यात येईल, असे राज्य मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.