महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील (एमपीएससी) मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आता निम्म्याने घटणार असून पूर्व परीक्षेतील चुरसही वाढणार आहे. आयोगाने पूर्व परीक्षेच्या निकालाचे निकष बदलले असून आता एकूण पदसंख्येच्या आठ पट विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. यापूर्वी हे प्रमाण साधारण १४ पट होते. या वर्षीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचे निकाल नव्या निकषांनुसार जाहीर होणार आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षेबरोबरच इतर अनेक पदांच्या परीक्षा घेण्यात येतात. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये या परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड केली जाते. त्यातील पूर्व परीक्षेचे गुण ही फक्त चाळणी परीक्षा म्हणून गृहीत धरण्यात येते. त्याचे गुण निकालासाठी गृहीत धरण्यात येत नाहीत. पूर्व परीक्षेतून उपलब्ध पदसंख्येच्या साधारण चौदा पट विद्यार्थी हे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात येत असत आणि मुख्य परीक्षेतून पदांच्या साधारण तीन पट विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरवण्यात येत असत. आता या निकषांमध्ये आयोगाने बदल केला असून पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेत पात्र ठरवण्याचे प्रमाण कमी केले आहे. यापुढे पूर्व परीक्षेतून प्रत्येक प्रवर्गानुसार पदसंख्येच्या साधारण ८ पट विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात येणार आहेत. आयोगाने राज्यसेवा परीक्षा आणि विक्रीकर निरीक्षक परीक्षेबाबत नुकतेच परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या नव्या निकषामुळे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास निम्म्याने घटणार आहे. त्यामुळे आता पूर्व परीक्षेपासूनच चुरस वाढणार आहे. त्यामुळे आता उमेदवारांना पूर्व परीक्षाही गांभीर्याने घ्यावी लागणार आहे. मात्र, अनेक पात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीतीही उमेदवारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पूर्व परीक्षा ही चाचणी परीक्षा असते. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या स्वरूपातही फरक आहे. पूर्व परीक्षेत कमी गुण मिळालेले उमेदवार मुख्य परीक्षा आणि मुलाखतींमध्ये आघाडी घेऊन पहिल्या दहा उमेदवारांमध्ये आल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे पात्रता असूनही संधीच डावलली जाण्याची भीती उमेदवारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

‘आयोगाने हा निर्णय नव्याने घेतलेला नाही. पूर्वी साधारण दहा पट उमेदवार निवडण्याचा संकेत होता. दोन टप्प्यांमध्ये उमेदवारांची निवड केली जाते. पहिल्या टप्प्यांत एकूण जागांच्या दहा पट उमेदवार गुणवत्तेनुसार निवडले जायचे आणि त्यानंतर प्रत्येक प्रवर्गानुसार उपलब्ध जागा आणि निवड झालेले उमेदवार यांच्या संख्येचा आढावा घेऊन ज्या प्रवर्गाचे विद्यार्थी दहा पटींपेक्षा कमी असतील, त्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड केली जायची. त्यामुळे ते प्रमाण साधारण १४ पटीपर्यंत पोहोचत असे. मूळ दहा पट उमेदवार निवडण्याच्या निकषांत नव्याने काही बदल करण्यात आलेला नाही.’
    – व्ही. एन. मोरे, अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग