आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) आणि राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (एनटीएस) येत्या रविवारी, १७ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. मात्र यासाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र अद्याप शाळांमध्येच पडून असल्याने बहुतांश विद्यार्थी या परीक्षांपासून वंचित राहतील की काय अशी भीती मुख्याध्यापकांना वाटत आहे.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी दरवर्षी शासनातर्फे विविध परीक्षांचे आयोजन केले जाते. यामध्ये ‘एनएमएमएस’ आणि ‘एनटीएस’ अशा दोन परीक्षांचे आयोजन दिवाळीची सुटी संपतानाच करण्यात आले आहे. या परीक्षांच्या प्रवेशपत्रांचे वाटप ६ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात यावे, अशी सूचना राज्य परीक्षा परिषदेने काढली होती. पण या कालावधीत दिवाळीच्या सुटय़ा असल्यामुळे बहुतांश विद्यार्थी बाहेरगावी गेले आहेत. आता परीक्षेला अवघे दोन दिवस उरलेले असतानाही अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र शाळांमध्येच पडून असल्यामुळे विद्यार्थी परीक्षांना बसतील की नाही अशी शंका महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ महामंडळाने व्यक्त केले आहे.
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षांसाठी अर्ज केले आहेत त्यांनी शाळांशी संपर्क साधावा असे आवाहनही महामंडळाने केले आहे.