उच्च न्यायालयानेच नियुक्तीवर आक्षेप उपस्थित केल्याने कुलगुरू राजन वेळुकर यांनी ‘भारतीय विज्ञान परिषदे’त सहभागी होऊ नये, अशी मागणी जोर पकडू लागली आहे.
या परिषदेचे आयोजन विद्यापीठाच्या वतीने करण्यात येणार असून विद्यापीठाचे प्रमुख म्हणून या परिषदेचे नेतृत्व करण्याची संधी वेळुकर यांच्यावर असणार आहे. वेळुकर यांच्या कुलगुरू पदाच्या निवडीबाबत न्यायालयाने नुकत्याच मारलेल्या ताशेऱ्यांमुळे त्यांनी त्वरित राजीनामा देणे अपेक्षित होते; परंतु ते अजूनही कुलगुरूपद उपभोगत आहेत. यावर आक्षेप घेत ‘युवा सेना’ या ‘शिवसेना’प्रणीत विद्यार्थी संघटनेच्या आठ अधिसभा सदस्यांनी कुलगुरूंना या परिषदेचे नेतृत्व करू देऊ नये, अशी मागणी विद्यापीठाचे कुलपती या नात्याने राज्यपाल सी. व्ही. राव यांच्याकडे केली आहे.
३ ते ७ जानेवारीदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान परिषदेचे आयोजन विद्यापीठ करीत असले तरी त्याचे नेतृत्व प्र-कुलगुरू किंवा तत्सम अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून वेळुकर यांना नेतृत्व करण्यास मज्जाव करावा, अशी युवा सेनेच्या सदस्यांची मागणी आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयातील अनेक घोटाळे बाहेर काढणाऱ्या ‘मुक्ता’ या शिक्षक संघटनेने वेळुकर यांना वादग्रस्त आणि कामचुकार ठरवून त्यांची हकालपट्टी राज्यपालांनी करावी, अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे.