अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत ऑनलाइन प्रक्रियेतील २ लाख ६४४ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ८८ हजार १५८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. यात वाणिज्य शाखेतील एक लाख बारा हजार ४९२, विज्ञान शाखेतील ६० हजार ७७३, तर कला शाखेतील १४ हजार ८९३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच ५० हजार ८८८ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालयही मिळाले आहे.
पहिल्या गुणवत्ता यादीत नाव मिळालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयांमध्ये जाऊन ५० रुपये शुल्क भरून २३ ते २५ जून या कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीत बेटरमेंटचा पर्याय स्वीकारता येणार आहे.
पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर २८ हजार जागा शिल्लक राहिल्या असून १२ हजार विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळालेला नाही. या विद्यार्थ्यांना दुसऱ्या यादीत प्रवेश मिळू शकेल, अशी माहिती प्रभारी साहाय्यक संचालक बी. डी. पुरी यांनी दिली.
जागांपेक्षा विद्यार्थी जास्त
शहरांतील काही महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्षात उपलब्ध असलेल्या जागांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यामुळे महाविद्यालय प्रशासनांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या महाविद्यालयांनी अंतर्गत कोटय़ातील प्रवेश प्रक्रियेत भरलेल्या जागांची माहिती योग्य पद्धतीने न दिल्याने हा गोंधळ झाल्याचे पुरी यांनी स्पष्ट केले. अशा महाविद्यालयांमध्ये पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जागांचा तपशील अद्ययावत करताना योग्य ती काळजी घेतली जाईल.

काही महत्त्वाच्या महाविद्यालयांचे कटऑफ
* रुईया महाविद्यालय
विज्ञान – ९३.४० टक्के
कला – ९३.०० टक्के
* के. जे. सोमय्या महाविद्यालय
विज्ञान – ९१ टक्के
वाणिज्य (विनाअनुदानित) – ८८.४० टक्के
* वझे महाविद्यालय
विज्ञान – ९३.२ टक्के
वाणिज्य – ८९.८ टक्के
कला – ८१.६ टक्के
* सेंट अँड्रय़ूूज
कला – ८० टक्के
विज्ञान – ८६.४० टक्के
वाणिज्य – ८४ टक्के
* पोद्दार महाविद्यालय
वाणिज्य – ९२ टक्के
* रुपारेल महाविद्यालय
विज्ञान – ९२.८१ टक्के
वाणिज्य – ८९.८ टक्के
कला – ८७ टक्के