संपूर्ण ‘पेपरलेस’ तत्त्वाचे पालन करत यंदा चौथी आणि सातवीचे शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्यात येणार आहेत. ही परीक्षा २२ मार्च, २०१५ला होणार आहे.
चौथी आणि सातवीसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या ऑनलाईन अर्जस्वीकृतीला सुरूवात झाली असून शाळांना ४ डिसेंबपर्यंत हे अर्ज भरून द्यायचे आहेत. हे अर्ज शाळेमार्फतच स्वीकारले जातील. एरवी शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज ऑगस्ट-सप्टेंबपर्यंत भरून घेतले जातात. परंतु, गेल्या वर्षी या परीक्षेकरिता प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेली ऑनलाईन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया यंदा सार्वत्रिक करण्यात आल्याने अर्ज भरण्यास नोव्हेंबर उजाडला. केवळ अर्जच नव्हे प्रवेशपत्रही विद्यार्थ्यांना ऑनलाईन देण्यात येणार आहे. ऑनलाईन प्रक्रियेत वेळ, श्रम वाचणार असल्याने शाळांनीही विलंब झाला असला तरी याचे स्वागतच केले आहे.
ऑनलाईन प्रक्रिया म्हणता-म्हणता अनेकदा यात विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची प्रिंटआऊट काढून ती परीक्षा मंडळांकडे किंवा संस्थांकडे सुपूर्द केली जाते. अशा वेळी ऑनलाईन पद्धतीमध्ये अपेक्षित असलेल्या ‘पेपरलेस’ उद्देशाला हरताळ फासला जातो. केवळ छापील अर्जामध्ये उपलब्ध असलेली विद्यार्थ्यांची माहिती आयती ऑनलाईन उपलब्ध होणे, हेच एकमेव उद्देश यात साध्य होते. मात्र, ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे’तर्फे शिष्यवृत्ती परीक्षेकरिता ऑनलाईन भरून घेण्यात येणाऱ्या अर्जाचे प्रिंटआऊट शाळांकडून मागविण्यात आलेले नाही. केवळ परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या नावांची यादी शाळांनी आमच्याकडे पाठवायची आहे, असे परिषदेचे सहआयुक्त राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
ऑनलाईन अर्ज स्वीकृती प्रक्रियेचे शाळांनाही स्वागत केले आहे. ‘ऑनलाईन अर्जस्वीकृतीमुळे वेळ व श्रम वाचतात. तसेच, नोंदणीही अचूक होणार आहे. त्यामुळे, आम्ही या प्रक्रियेचे स्वागतच करतो,’ असे ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यावक संघ महामंडळा’चे प्रवक्ते प्रशांत रेडीज यांनी सांगितले. मात्र, ’अर्ज भरण्याची प्रक्रिया संपूर्णपणे पेपरलेस असली तरी अर्थात संकेतस्थळ हॅक होण्याची भीती असल्याने आम्ही या अर्जाचे प्रिंटआऊट काढून ठेवणार आहोत. जेणेकरून विद्यार्थ्यांची माहिती आमच्याकडे उपलब्ध राहील,’ अशी हिल्डा कॅस्टिलिनो हायस्कुलचे मुख्याध्यापक असलेल्या रेडीज यांनी स्पष्ट केले. अधिक माहितीसाठी संपर्क –  http://www.mscepune.in