ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांला त्याच्या भाषेत दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यायचे असेल तर ऑनलाईन अध्ययन पद्धतीला पर्याय नाही. कारण, उच्चशिक्षण व्यवस्थेत बदल घडवून आणण्याची क्षमता यात व्यवस्थेत आहे, असे आग्रही प्रतिपादन करत ‘टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस’ आणि रामादोराई ‘राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेचे’ अध्यक्ष एस. रामादोराई यांनी ऑनलाईन अध्ययनाचे महत्त्व वाढविण्यावर जोर दिला.
‘आयआयटी’च्या ५१व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या समारंभात २०४४ विद्यार्थ्यांना पीएचडी, डय़ुएल पदवी, एमएस्सी, एमफिल, बीटेक, एमटेक, व्यवस्थापन आदी वेगवेगळ्या पदव्या देण्यात आल्या.
सागर चोरडिया या विद्यार्थ्यांला राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले. तर संस्थेचे सुवर्ण पदक सिसिर यालामनचिली याला बहाल करण्यात आले. सौरभ सुर्यवंशी डॉ. शंकरदयाळ शर्मा सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. तर ‘कॉर्नेल विद्यापीठा’चे अर्थशास्त्राचे प्राध्यापक आणि जागतिक बँकेचे उपसंचालक आणि सल्लागार प्रा. कौशिक बासू आणि स्ट्रींग थिअरीतील योगदापूर्ण संशोधनाबद्दल अलाहाबादच्या ‘हरिश्चंद्र रिसर्च इन्स्टिटय़ूट’चे प्राध्यापक अशोक सेन यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या पदवीने गौरविण्यात आले. यावेळी आयआयटीचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, संचालक देवांक खक्कर, मोनॅश विद्यापीठाचे कुलपती आदी मान्यवर उपस्थित होते.
ऑनलाईन शिक्षण व्यवस्थेमुळे शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, ज्ञानाची देवाणघेवाण होण्यास मदत होईल. किंबहुना याच माध्यमातून ‘आयआयटी’सारख्या दर्जेदार संस्थांमधील शिक्षण ग्रामीण भागापर्यंत पाहोचेल, असे रामादोराई यांच्या भाषणाचे सूत्र होते. ऑनलाईन अध्ययनात राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विविध बदलांचा त्यांनी आढावा घेतला. शिक्षणाबरोबरच व्होकेशनल प्रशिक्षण घेणेही यामुळे सहससोपे होईल. काही कंपन्या तर आपल्या कर्मचाऱ्यांनाही या माध्यमातून प्रशिक्षण देत आहेत. मग हाच मार्ग शिक्षण व्यवस्थेतही चोखाळायला काय हरकत आहे, असे त्यांचे म्हणणे होते. एकटय़ा भारतात ऑनलाईन शिक्षणात होणारी आर्थिक उलाढाल २०१७पर्यंत दुप्पट होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

संशोधनकार्य वाढले
‘आयआयटी’मधील संशोधन कार्य गेल्या वर्षीच्या तुलनेत ५४ टक्क्य़ांनी वाढल्याची माहिती या वेळी खक्कर यांनी दिली. गेल्या वर्षी संशोधनासाठी संस्थेला १८९ कोटी मिळाले होते. ते यंदा २९३ काटी रुपयांवर गेल्याचे त्यांनी सांगितले.

पहिल्या १००तले ६७ जण मुंबईत
मुंबई-‘आयआयटी’चा दबदबा देशात कसा आहे हे सांगताना खक्कर यांनी ‘जेईई’ या ‘आयआयटी’साठीच्या प्रवेश परीक्षेत पहिल्या शंभरात आलेल्या तब्बल ६७ विद्यार्थ्यांनी मुंबईच्या ‘आयआयटी’त प्रवेश घेणे पसंत केल्याची माहिती दिली. तर पहिल्या दहामधील आठजण मुंबई ‘आयआयटी’त आले आहेत.