ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटनसह जगभरातील १३० देशांमधील नऊ हजार महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी इंग्रजीची पात्रता तपासण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ‘टोफेल’ या परीक्षेसाठी यावर्षी प्रथमच ‘मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्स’ (मूक)च्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण १३ जूनपासून उपलब्ध होणार आहे.

परदेशातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असताना उच्च दर्जाची इंग्रजी भाषा येणे क्रमप्राप्त असते. यासाठी टोफेल ही परीक्षा घेतली जाते. यातील गुणांचा विचार प्रवेश देताना केला जातो. या परीक्षेच्या अभ्यासासाठी आतापर्यंत विद्यार्थ्यांना खासगी शिकवणी किंवा उपलब्ध पुस्तकांवरच अवलंबून राहावे लागत होते. मात्र आता हार्वर्ड विद्यापीठ आणि मॅस्चेस्टस इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने तज्ज्ञांच्या मदतीने सहा आठवडय़ांचा एक अभ्यासवर्ग तयार केला आहे. हा वर्ग ऑनलाइन असणार असून यामध्ये पहिल्या आठवडय़ात ओळख करून दिली जाणार आहे. यानंतरच्या चार आठवडय़ांमध्ये वाचन, ऐकणे, बोलणे आणि लिहिणे ही कौशल्ये विकसित करण्यासाठी मार्गदर्शन होणार आहे. तर शेवटच्या आठवडय़ात परीक्षा होणार असून थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून एक मार्गदर्शनपर कार्यक्रम दाखविला जाणार आहे. हे वर्ग आठवडय़ाला दोन तास होणार असून ते पूर्णत: मोफत असणार आहे. मूकच्या माध्यमातून प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र हवे असल्यास तुम्ही मिळवलेल्या ज्ञानाच्या आधारे एक प्रमाणपत्र शुल्क भरल्यास दिले जाणार आहे. या अभ्यासक्रमाची माहिती www.ets.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.