22 November 2017

News Flash

नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या चौकशीचे आदेश

राजभवनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून खोटय़ा कागदपत्रांद्वारे कुलगुरूपद आणि प्राध्यापकपद मिळविल्याच्या आरोपाप्रकरणी नागपूर विद्यापीठाचे

प्रतिनिधी, मुंबई | Updated: February 28, 2013 2:16 AM

राजभवनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून खोटय़ा कागदपत्रांद्वारे कुलगुरूपद आणि प्राध्यापकपद मिळविल्याच्या आरोपाप्रकरणी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या फौजदारी तक्रारीची चार आठवडय़ांत चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नागपूर पोलीस आयुक्तांना दिले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि जनसंवाद अभ्यास विभागाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांनी केलेल्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने हे आदेश दिले. बुधवारी झालेल्या याचिकेच्या अंतिम सुनावणीच्या वेळी न्यायालयाने नागपूर पोलीस आयुक्तांना डॉ. सपकाळ यांच्याविरुद्ध तक्रारीची चौकशी करण्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून अहवाल मागविण्याचे आणि हा अहवाल पुढील कारवाईसाठी सीताबर्डी पोलीस ठाण्याकडे पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
९ फेब्रुवारी २०११ रोजी याप्रकरणी केलेल्या फौजदारी तक्रारीवर कारवाई करण्याचे आदेश देण्याची तसेच पोलीस उपायुक्त दर्जाच्या खालच्या अधिकाऱ्याकडून या प्रकरणाचा तपास करू नये, अशी विनंती मिश्रा यांनी केली होती.
मिश्रा यांच्या याचिकेनुसार, डॉ. सपकाळ यांनी नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत होतो, असा दावा केला होता. परंतु त्यांची ही नियुक्तीच बेकायदा होती. त्यांनी ही नियुक्ती होताना चुकीची माहिती विद्यापीठाला दिली होती. मुंबईतील ‘आयन एक्स्चेंज इंडिया प्रा. लि.’ आणि बंगळुरू येथील सराटोरियस बायोटेक (आय) प्रा. लि. अशा दोन इन्स्टिटय़ूटमध्ये महत्त्वाच्या पदी काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
प्रत्यक्षात या दोन्ही इन्स्टिटय़ूटकडून पत्रव्यवहाराद्वारे मागविलेल्या माहितीत अशा नावाची व्यक्ती आपल्याकडे कधीच कार्यरत नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मिश्रा यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राजभवन, अमरावती विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठ यांच्याकडून माहितीच्या अधिकाराअंतर्गत डॉ. सपकाळ यांच्याबाबत माहिती मागविण्यात आली. मात्र त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतची कुठलीच कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे कळविण्यात आले. अखेर मिश्रा यांनी डॉ. सपकाळ यांनाच पत्र पाठवून त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत आणि अनुभवाबाबतच्या कागदपत्रांची मागणी केली. त्यावर ही आपली व्यक्तिगत मालमत्ता असल्याचा दावा करीत मिश्रा यांनी ती देण्यास नकार दिला.
शेवटी मिश्रा यांनी मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाण्यात राजभवनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून डॉ. सपकाळ यांनी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरूपद पटकाविल्याबाबत तक्रार नोंदवली. गुन्हा नागपूरमध्ये घडलेला असल्याने मुंबई पोलिसांनी नागपूर पोलिसांकडे वर्ग केले. परंतु नागपूर पोलिसांनी चौकशी न करताच प्रकरण पुन्हा मुंबई पोलिसांकडे पाठवले. या टोलवाटोलवीमुळे मिश्रा यांनी अखेर उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयानेही प्रकरण नागपूर खंडपीठाकडे वर्ग केली.

First Published on February 28, 2013 2:16 am

Web Title: order to investigate napur university kulguru