कुंभमेळ्याचे कारण देऊन इतर परीक्षांच्या तारखांची कोणतीही खातरजमा करता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘सेट’ परीक्षा पुढे ढकलल्याने इतर परीक्षांची पंचाईत करून ठेवली असून विद्यार्थी संभ्रमात आहेत.
पुणे विद्यापीठाने गेल्या २९ मे रोजी ऑनलाइन पत्रकानुसार ३० ऑगस्टला ‘सेट’ परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने १ जून ते ३० जूनपर्यंत अर्ज आणि परीक्षा शुल्क जमा करण्यात आले, परंतु आता पुणे विद्यापीठाने नाशिकच्या कुंभमेळ्याचे कारण पुढे करून ३० ऑगस्टला होऊ घातलेली ही परीक्षा ६ सप्टेंबरला जाहीर केली आहे. या नवीन तारखेमुळे राज्यातील ग्रंथालयशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कारण, त्याच दिवशी केंद्रीय विद्यालय संघटनेची (केव्हीएस) देशभर परीक्षा आहे. केव्हीएसने त्यांचे वेळापत्रक पुणे विद्यापीठाच्या सुधारित वेळापत्रकापूर्वीच म्हणजे, १३ जुलैलाच जाहीर केले होते.
पुणे विद्यापीठाने ‘सेट’ची परीक्षा पुढे ढकलताना इतर परीक्षांची माहिती घेतलेली नाही. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणात फक्त राज्यातील ग्रंथालयशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांचेच नुकसान होणार आहे. केव्हीएसची परीक्षा उत्तीर्ण केली तर थेट नोकरी मिळते आणि ‘सेट’ उत्तीर्ण केली तर नोकरीसाठीची पात्रता सिद्ध होते, नोकरी मिळत नाही! केव्हीएस परीक्षेच्या वेळापत्रकाची पुणे विद्यापीठाने दखल न घेताच सेटची तारीख जाहीर केली. या संदर्भात पुणे विद्यापीठाशी संपर्क साधला असता ‘आम्ही काय सर्वाचा विचार करावा काय? आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला कुठली परीक्षा द्यायची ते? आमचा आणि केंद्रातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा संबंध नाही’, अशी उत्तरे मिळाल्याचा संताप ‘सेट’साठी अर्ज केलेल्या अश्विन वाघमारे यांनी व्यक्त केला. हा तिढा सुटला नाही तर केव्हीएसमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांची टक्केवारी कमी होईल. कारण, दोनपैकी कुठल्याही एकाच परीक्षेला विद्यार्थ्यांना बसता येणार असल्याने परीक्षा शुल्काची वाया गेलेली रक्कम आणि त्यामुळे हुकणारी एक संधी, असा दुहेरी तोटा होणार आहे.