विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षांच्या (बीएस्सी) प्रात्यक्षिक परीक्षेबरोबरच मंगळवारपासून (२४ मार्च) सुरू होणाऱ्या रसायनशास्त्राच्या पदव्युत्तर पदवी शाखेची (एमएस्सी) प्रात्यक्षिक परीक्षाही परीक्षकांना प्रवेशपत्रांविना (हॉल तिकिटे) घ्यावी लागणार आहेत, कारण या परीक्षेची प्रवेशपत्रेच विद्यापीठाने अद्याप तयार केलेली नाहीत. प्रवेशपत्रे नसल्याने प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये काही गैरप्रकार झाले, तर त्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न प्राध्यापकांकडून करण्यात येतो आहे.
‘टीवायबीएस्सी’च्या शेवटच्या सत्राची प्रात्यक्षिक परीक्षा १९ मार्चपासून सुरू झाली; परंतु या परीक्षेची प्रवेशपत्रे परीक्षा सुरू झाल्यानंतर एक दिवसाने महाविद्यालयांना पोहोचती करण्यात आली. आतापर्यंत प्रवेशपत्रांविना प्रात्यक्षिक परीक्षा कधीच पार पडलेल्या नाहीत. आता मंगळवारपासून सुरू होणाऱ्या एमएस्सीच्या रसायनशास्त्राच्या चौथ्या सत्राच्या प्रात्यक्षिक परीक्षेची प्रवेशपत्रेही परीक्षेपूर्वी तयार करण्यात परीक्षा विभागाला अपयश आले आहे. इतकेच काय, तर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे आसनक्रमांकही शनिवापर्यंत महाविद्यालयांना कळविण्यात आले नव्हते, त्यामुळे परीक्षा घ्यायच्या कशा, असा प्रश्न प्रात्यक्षिक परीक्षांकरिता परीक्षक म्हणून काम करणाऱ्या प्राध्यापकांना पडला आहे.
रसायनशास्त्राचे सुमारे २२०० विद्यार्थी एमएस्सीच्या प्रात्यक्षिक परीक्षेला बसणार आहेत. या विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयाऐवजी वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा द्यावी लागते. त्या परीक्षा केंद्रांवर दुसऱ्याच महाविद्यालयाचे प्राध्यापक येऊन परीक्षक म्हणून परीक्षा घेतात. म्हणजे संपूर्णपणे अनोळखी असलेल्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा परीक्षकांना घ्यावी लागते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांकडे त्यांची प्रवेशपत्रे नसतील, तर परीक्षा कुणाच्या जबाबदारीवर घ्यायची, असा प्रश्न एका प्राध्यापकांनी केला. अशा परिस्थितीत परीक्षकांना संबंधित विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे ओळखपत्र आणि जर्नलच्या साहाय्याने ओळख पटवून त्यांना परीक्षेला बसू द्यावे लागणार आहे. त्यातून पुढच्या आठवडय़ापासून भौतिशास्त्राच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार आहेत. त्यांनाही अद्याप प्रवेशपत्रे मिळालेली नाहीत.
या संदर्भात परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आसन क्रमांक व्यवस्था तयार असल्याचे स्पष्ट केले. सोमवापर्यंत आम्ही ती महाविद्यालयांना कळवू; परंतु प्रवेशपत्रे अद्याप तयार झालेली नाहीत. तसेच, प्रात्यक्षिक परीक्षेकरिता त्यांची तशी गरजही नाही, असा खुलासा त्यांनी केला. परीक्षा यंदा लवकर होत आहेत म्हणून प्रवेशपत्रे वेळेत तयार झाली नाहीत, असे स्पष्टीकरण त्यांनी केले.
मात्र, मुळात तयारी नसताना परीक्षा घेण्याची गरज काय, असा प्रश्न उद्भवतो, किंबहुना एमएस्सीच्या प्रात्यक्षिक परीक्षा याच काळात होतात. उलट तिसऱ्या सत्राचा निकाल रखडल्याने यंदा परीक्षा लांबल्या, असे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
BBA
बीबीए, बीएमएस, बीसीएच्या प्रवेशांचीच परीक्षा… झाले काय?
Release of candidates
वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी