कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी मदतीचा हात दिल्याने मुंबईतील बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयांना शुक्रवारी सुरळीतपणे बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेता आल्या.
‘महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघा’च्या या असहकारामुळे बहुतेक कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षांचे काम जवळपास ठप्प झाले होते. पण, शिक्षण विभागाने अतिरिक्त कर्मचारी पुरविल्याने तसेच महाविद्यालयांना पोलिस संरक्षण पुरविल्याने शुक्रवारी प्रात्यक्षिक परीक्षा सुरळीपणे घेता आल्या.
बहुतेक महाविद्यालये शिक्षकांच्या मदतीने परीक्षा घेत आहेत. काही महाविद्यालयांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, चर्चेनंतर कर्मचाऱ्यांनी परीक्षेच्या कामात व्यत्यय आणला नाही.
रूपारेल, रुईया, रिझवी या महाविद्यालयांना परीक्षेच्या कामासाठी अतिरिक्त कर्मचारी पुरविण्यात आल्याची माहिती मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक एन. बी. चव्हाण यांनी दिली. तसेच, खालसा, एसआयडब्ल्यूएस, रिझवी आदी महाविद्यालयांना पोलीस संरक्षणही पुरविण्यात आले आहे.