डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ३ ते ७ जानेवारीदरम्यान ‘प्री-सायन्स काँग्रेस’चे आयोजन करण्यात आले आहे. मनुष्यबळ विकासात विज्ञानाचे महत्त्व या परिषदेतून सांगितले जाणार आहे. दोन दिवसांत २४७ संशोधन लेख व १७५ पोस्टर्सचे सादरीकरण होणार आहे. परिषदेसाठी इस्राएलमधील नोबेल विजेते अदा योनाथ यांची उपस्थिती असेल, तर या निमित्ताने पत्रकार फरीद झकेरिया यांचेही व्याख्यान होणार असल्याची माहिती कुलगुरू बी. ए. चोपडे यांनी दिली.
 देशभरातील संशोधक आणि विज्ञानातील नामवंत या परिषदेत सहभागी होणार असून १०२ व्या भारतीय विज्ञान परिषदेच्यापूर्वी ही परिषद घेतली जाणार आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत देण्यात येणार आहे. या परिषदेत जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, मायक्रोबायोलॉजी, बायोफिजिक्स, बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी या विषयांसह केमिकल सायन्स, फिजिकल सायन्स, गणितीय विज्ञान यांसह विविध ६ विभागांत सत्र होणार असून विद्यापीठात ८ ठिकाणी एकाच वेळी संशोधन निबंध सादर केले जाणार आहे.
प्रत्येक सत्रासाठी एका नामवंत व्यक्तीचे मार्गदर्शन मिळणार असून या परिषदेची तयारी पूर्ण झाली असल्याचे चोपडे यांनी सांगितले.