मुंबई विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना रेल्वे प्रशासनासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षांपासून रेल्वे तंत्रज्ञानाविषयी अनेक अभ्यासक्रम शिकविणारे कल्पकता आणि तंत्रज्ञान केंद्र उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात भारतीय रेल्वे आणि विद्यापीठात शैक्षणिक सामंजस्य करारही करण्यात आला आहे.
भारतीय रेल्वेच्या व्हिजन -२०२० उपक्रमाअंतर्गत रेल्वेला कुशल मनुष्यबळ आणि तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणक्रम आणि रेल्वेच्या गरजानुसार संशोधनाला चालना मिळण्यासाठी भारतीय रेल्वेने उच्च शिक्षणात रेल्वेशी निगडित तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला.
याच अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी शैक्षणिक सहकार्य करत सामंजस्य करार करण्यात आला. सोमवारी झालेल्या मॅनेजमेंट कौन्सिलच्या बठकीत या कराराला मान्यता देण्यात आली आहे.
यासाठी पाच वर्षीय अर्थसंकल्पीय तरतूद म्हणून रेल्वेने १४२.८९ कोटींची तरतूद केली आहे. ज्यामध्ये प्रथम वर्षांसाठी (२०१५-१६) रुपये २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ज्यामध्ये पायाभूत सुविधा ८ कोटी, प्रयोगशाळा आणि साहित्य ८ कोटी, मानव संसाधन ३.५० कोटी, अनुदान ०.२५ कोटी, प्रवास खर्च ०.२५ कोटी, प्रकल्प निधी ५ कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे.

केंद्रातील अभ्यासक्रम
’एम.टेक /एमई (रेल्वे मॅकेनिकल इंजीनीअरींग)
’एम.टेक /एमई  (रेल्वे सिव्हील इंजीनिअरींग)
’एम.टेक /एमई (रेल्वे इलेक्ट्रीकल इंजीनिअरींग)
’रेल अँड व्हील इंटरॅक्शन
’डायनामिक मॉडेिलग
’नॉईज अँड व्हायब्रेशन कंट्रोल
’टनेल अँड ब्रिजेस
’ हाय स्पीड रेल
’ सिग्नल अँड सिस्टम

मुंबई विद्यापीठ आणि भारतीय रेल्वे यांच्यात झालेला  शैक्षणिक सहकार्य करार हा महत्वांकाक्षी आणि बहुउद्देशीय निर्णय आहे, विद्यापीठाच्या नव्याने येऊ घातलेल्या ‘स्कूल ऑफ इंजिनीअरिंग सायन्स’मध्ये हे अभ्यासक्रम सुरु केले जाणार आहेत, या केंद्राच्या माध्यमातून रेल्वेसाठी लागणारे विशेष कुशल मनुष्यबळ आणि संशोधनाला यामुळे नक्कीच चालना मिळेल.
– डॉ.एम.ए.खान, कुलसचिव, मुंबई विद्यापीठ