खामगावच्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्रमांक सहा आणि स्वामी विवेकानंद नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्रमांक नऊ यांनी वर्षांनुवर्षे विद्यार्थ्यांचा ओघ कायम ठेवला आहे. खामगावात इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट किंवा खाजगी शाळा नाहीत, असे अजिबात नाही तरीही जनमानसात शाळेबद्दलचा विश्वास कायम ठेवून प्राथमिक वर्गाच्या पाच पाच तुकडय़ा भरवण्याची विद्यार्थ्यांची श्रीमंती त्यांच्याकडे आहे. शाळेचे शिक्षक सांगतात, २००७मध्ये ९००च्या जवळपास विद्यार्थी होते. यावर्षी सहा क्रमांकाच्या शाळेत १,०४८ विद्यार्थी आहेत. शहराच्या मध्यभागी शाळा असणे हा एक ‘प्लस पॉईंट’ सोडल्यास बाकी सर्वच बाबतीत सहा क्रमांकाची शाळा महाराष्ट्रातील महापालिका आणि नगरपालिकांच्या शाळांसाठी ‘रोल मॉडेल’ ठरणारी आहे.
इंग्रजी शिक्षणाचा पाल्यापेक्षा पालकांच्या डोक्यावर असलेला पगडा खामगावातही आहे पण, मराठी माध्यमामध्ये इंग्रजी विषयाबरोबरच, संगणक आणि इतर ज्ञान विद्यार्थ्यांना मिळत असल्याने विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास होत असल्याचा तेथील पालकांचा अनुभव आहे. म्हणून वर्ग एकच्या अधिकाऱ्याबरोबरच मुख्याध्यापक, शिक्षक, पोलीस, नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची मुले देखील याच नगरपालिकेच्या शाळेत शिकतात.
नगरपरिषदांच्या शाळांमध्ये ५० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे गुणोत्तर ठरवण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद नगर परिषदेच्या नऊ क्रमांकाच्या शाळेत पहिली ते चौथी पर्यंत ४५८ विद्यार्थी आणि नऊ शिक्षक आहेत. अतिरिक्त शिक्षक होण्याची नामुष्की या शाळेच्या शिक्षकांवर नाही. शिस्तीचे अवडंबर न माजवता मुलांना त्यांच्या नैसर्गिक कलाप्रमाणे त्यांना सांभाळण्यात नऊ क्रमंकाची शाळा यशस्वी ठरली आहे.
महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी कमी आणि शिक्षक जास्त अशी अवस्था आहे. काही ठिकणी तर तीन विद्यार्थ्यांच्या मागे चार शिक्षक इतपत दयनीय अवस्था दिसून येते. या सर्व कारणांचा शोध घेण्याची संधी ईशान होप संस्थेच्या माध्यमातून आली. महापालिका विभागांचे विभाजन करून महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळांमध्ये महापालिकेच्या इतर विभागांचे पुनर्वसन केल्याचे दिसून येते. या पाश्र्वभूमीवर खामगावच्या नगरपरिषदांच्या शाळांचे वैशिष्टय़ उठावदारपणे दिसते.