मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष २०१४-१५ साठी होणाऱ्या प्रवेशासाठी गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. यंदा हा निर्णय अभियांत्रिकी बीएड, आर्किटेक्चर, औषधशास्त्र या अभ्यासक्रमासाठीही लागू करण्यात आला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या या निर्णयानुसार विद्यापीठ आणि त्याअंतर्गत येणाऱ्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेसह विविध शाखेच्या महाविद्यालयांतील पदवी, पदव्युत्तर आणि विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मागील वर्षांप्रमाणेच ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणी सक्तीची करण्यात आलेली आहे. मुंबई विद्यापीठातील बीए, बीकॉम, बीएससी, बीएमएम, बीएसडब्लू, बीएससी, बीएससी (होम सायन्स), बीएससी (फॉरेन्सिक सायन्स), यासारख्या एकूण ४२ अभ्यासक्रमांसाठी ही नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. यामध्ये यंदा अभियांत्रिकी, विधी, औषधशास्त्र आणि आर्किटेक्चर या शाखांचाही समावेश करण्यात आला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया एमकेसीएलमार्फत राबविण्यात येणार असून यंदा या प्रक्रियेत महाविद्यालयांच्या यादीचाही समावेश करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी या प्रक्रियेत अनेक त्रुटी आढळल्याने विद्यापीठावर तब्बल तीनवेळा ही नोंदणी प्रक्रियेची मुदत वाढविण्याची वेळ आली होती. यामुळे विद्यापीठ प्रशासनावर टीका करण्यात आली होती. याची गंभीर दखल घेत विद्यापीठाकडून सोमवारपासून विद्यापीठातील प्रमुख अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबतच सर्व महाविद्यालयांतील प्राचार्य, लिपिक, तंत्रज्ञांसाठी प्रशिक्षणाचा कार्यक्रम आखला आहे. जो कालिना संकुलातील फिरोजशहा मेहता भवनात होणार असून तो २८ मेपर्यंत चालणार आहे.