विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी रूची आणि करिअर करण्याची जिज्ञासा निर्माण करण्याच्या उद्देशाने घेतल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित ‘डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धे’च्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.‘मुंबई विज्ञान अध्यापक मंडळा’तर्फे ही परीक्षा घेतली जाते. विद्यार्थ्यांना आणि पालकांना मंडळाच्या http://www.msta.in या संकेतस्थळावर या परीक्षेचा निकाल पाहता येईल. मुंबई-ठाण्यातून मोठय़ा संख्येने विद्यार्थी ही परीक्षा देतात.
यंदा सहावीच्या २१ हजार २७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी १६ हजार ७३९ इतके विद्यार्थी ३५ हून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. तर सर्वोच्च कामगिरी करणारे पहिले ७.५ टक्के विद्यार्थी आहेत एकूण १ हजार ६७७. हे विद्यार्थी दुसऱ्या टप्प्याच्या मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. नववीच्या १६ हजार ३५१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ८ हजार ७९५ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर १ हजार ३०६ इतके विद्यार्थी सर्वोच्च कामगिरी करणारे आहेत. हे विद्यार्थी मुलाखतीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निवडण्यात आले आहेत, अशी माहिती मंडळाचे सदस्य अच्युतराव माने यांनी दिली. २०१३च्या ६ जानेवारीला सहावी आणि १३ जानेवारीला नववीची प्रात्यक्षिक परीक्षा होईल. मुंबईत परळच्या सोशल सव्‍‌र्हिस लीगच्या शाळेत, ठाण्यात एम. एच. हायस्कुल आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी पुण्याच्या कोथरूड येथील बालशिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम शाळेत प्रात्यक्षिक परीक्षा पार पडेल.