दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रती देण्याच्या सुविधेपाठोपाठ यंदाच्या वर्षांपासून या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याची सुविधाही विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी शुक्रवारी दिली. उत्तरांना अपेक्षित गुण मिळाले नसल्याचे लक्षात आल्यास विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आता उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन होऊ शकणार आहे.
 विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबाबत शंका असल्यास यापूर्वी त्यांच्या गुणांची पुन्हा तपासणी करण्याची व्यवस्था होती. ही व्यवस्था सुरू ठेवून आता पुनर्मूल्यांकनाची नवी व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. माहिती अधिकारामध्ये मागील वर्षांपासून विद्यार्थ्यांना त्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रती देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, या व्यवस्थेत उत्तरपत्रिका पुन्हा तपासली जात नव्हती. आता विद्यार्थ्यांने अर्ज केल्यास पुनर्मूल्यांकन होऊ शकणार आहे.
उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स प्रत मिळण्याबाबत विद्यार्थ्यांने अर्ज केल्यानंतर गुणांची तपासणी करूनच ही प्रत देण्यात येते. झेरॉक्स प्रत मिळाल्यानंतर पाच दिवसांच्या आत विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकणार आहे. त्यासाठी उत्तरपत्रिकेची ही प्रत या विद्यार्थ्यांने त्याच्या शाळेतील संबंधित विषयाच्या शिक्षकास दाखवली पाहिजे. या शिक्षकाच्या अभिप्रायानंतरच पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करता येणार आहे. या अभिप्रायावर संबंधित शाळेचा शिक्का असणे गरजेचे आहे. पुनर्मूल्यांकन झाल्यानंतर उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने निकाल कळवण्यात येईल. मात्र, पुनर्मूल्यांकन झालेली उत्तरपत्रिकेची प्रत पुन्हा मिळणार नाही. उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स प्रतीसाठी ४०० रुपये, तर पुनर्मूल्यांकनासाठी प्रत्येक उत्तरपत्रिकेसाठी ३०० रुपयांची आकारणी आहे. पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रत्येक विभागामध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.