राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची रक्तगटापासून ते त्यांच्या आईवडिलांच्या उत्पन्नापर्यंतची माहिती एका ‘क्लिक’सरशी संगणकावर उपलब्ध व्हावी यासाठी राबविण्यात येणारा ‘सरल’ हा उपक्रम सध्या शिक्षकांसाठी चांगलाच तापदायक ठरतो आहे.
अध्यापनाबरोबरच दहावीच्या फेरपरीक्षांचे आयोजन, नैदानिक चाचणी अशी किती तरी कामे शिक्षकांच्या डोक्यावर असताना ‘सरल’चेही काम माथ्यावर येऊन पडले आहे. या अंतर्गत सर्व शाळांना आपल्याकडे शिकत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती १५ ऑगस्टपर्यंत शालेय शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या संगणक प्रणालीमार्फत भरून द्यायची आहे. केवळ विद्यार्थ्यांची नव्हे तर शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनाही ही माहिती भरून द्यायची आहे. परंतु, कित्येक शिक्षकांना संगणक वापरण्याची सवय नसल्याने हे सरल काम अवघड बनले आहे. त्यातच गेले पाच दिवस सव्र्हर डाऊन झाल्याने ‘सिस्टेमॅटिक अॅडमिनिस्ट्रेटीव्ह रिफॉम्र्स फॉर अॅचिव्हिंग लर्निग बाय स्टुड्ंटस’ अर्थात ‘सरल’ ही मोहीम चांगलीच थंडावली आहे.
सत्राच्या सुरुवातीलाच अशा प्रकारच्या वेळकाढू योजना आणून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा खेळखंडोबा केला जात असल्याची तक्रार ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याद्यापक संघा’चे प्रवक्ते प्रशांत रेडीज यांनी केली. त्यासाठी दिली गेलेली १५ ऑगस्ट ही मुदतदेखील कमी आहे. कारण, सरलमध्ये विद्यार्थ्यांचे आधार क्रमांकही द्यायचे आहेत. त्यामुळे आधी न काढलेल्या मुलांची आधार पत्रे काढून घेण्याचे काम शिक्षकांना करावे लागणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या वजन, उंची आदी माहितीबरोबरच पालकांच्या बँकेचा खात्याचा क्रमांक, भावडांचे शिक्षण आदी वैयक्तिक स्वरूपाची खूप माहितीही मागविली जात आहे. ती भरता भरता शिक्षकांना नाकी नऊ येते आहे. त्यामुळे, माहिती भरण्याच्या कामाला ३० सप्टेंबपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी रेडीज यांनी केली आहे. अनेक शाळांकडे तर संगणक आणि इंटरनेटही नाही. अशा शाळांमध्ये माहिती भरणे मोठे अडचणीचे झाले आहे. कारण, या शाळांमधील शिक्षकांना सायबरमध्ये जाऊन माहिती भरावी लागत आहे. यात शाळेच्या शैक्षणिक तासिकांचा वेळ वाया जात असल्याची तक्रार ‘शिक्षक भारती’चे जालिंदर सरोदे यांनी केली.
सव्र्हर डाऊन
गेले पाच दिवस सव्र्हर डाऊन असल्याने माहिती भरली जात नाही. भरलेली माहिती ‘करप्ट’ होऊन चुकीची माहिती दिसू लागते. या सर्व प्रकाराने शाळा, पालक, विद्यार्थी त्रस्त आहेत. कारण, आधीच ही माहिती सरकारने नेमून दिलेल्या संगणक प्रणालीमार्फत भरण्यास एका विद्यार्थ्यांमागे एक ते दीड तास लागतो. वर्गातील ५० ते ६० मुलांची माहिती भरायची तर त्यासाठी ५० ते ६० तास प्रत्येक शिक्षकाला या कामासाठी द्यावे लागत आहेत. त्यात कामाचे १० ते १२ तास वाया जात असल्याने शिक्षक आणि मुख्याध्यापकांमध्ये नाराजी आहे.
माहिती भरण्याचे काम संथगतीने!
शाळांमध्ये ही माहिती भरण्याचे काम अत्यंत संथपणे सुरू आहे. सरकारच्या माहितीनुसार ३ ऑगस्टपर्यंत अवघ्या २२,४२० शाळांनीच ही माहिती भरली होती. तर अद्याप ७९,५०४ शाळांनी अद्याप ही माहिती भरणे बाकी आहे.