देशसेवा म्हणजे केवळ देशासाठी मृत्यू पत्करणे नव्हे! आपली प्रत्येक कृती देशासाठी करणे म्हणजेच देशकार्य असल्याची साधी सोपी व्याख्या करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकदिनी देशभरातील कोटय़वधी विद्यार्थ्यांना भावनिक साद घातली. आपल्या घरातील विजेची बचत करा. पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घ्या. पर्यावरण बदलले नाही आपली सहनशक्ती कमी झाली. त्यामुळे स्वतला बदला. निसर्गाशी एकरूप व्हा. पर्यावरणाची समस्या आपोआपच संपेल, असा कानंमत्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
येथील माणेकशा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी थेट पंतप्रधानांनाच त्यांनी लहानपणी केलेल्या खोडय़ा, देशाचे शिक्षण धोरण, पर्यावरण, व्यक्तिगत जीवनाविषयी प्रश्न विचारले. पंतप्रधान मोदी यांनीदेखील मनमोकळेपणाने प्रश्नांना उत्तरे दिली. हल्ली बालपण लवकर संपत असल्याची खंत मोदी यांनी व्यक्त केली. लहानपण मनसोक्त जगा. पुस्तके वाचा, भरपूर वाचा; पण त्याबरोबर मैदानी खेळ खेळा. दिवसातून चार वेळा घाम निघाला पाहिजे, इतके खेळा. टीव्ही, संगणकात अडकून पडू नका, असा सल्लाही मोदीसरांनी दिला.
शाळेत स्वच्छता करायला लावली म्हणून विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, त्यांचे शोषण होत आहे, अशा आशयाच्या बातम्या वृत्त वाहिन्यांनी प्रसिद्ध केल्याचे मोदी यांनी सांगितले. आपल्या शाळेत स्वच्छता करण्यात गैर काय, असा प्रश्न त्यांनी केला.
खोडकर मोदी
पंतप्रधान मोदी यांना त्यांनी लहानपणी केलेल्या खोडय़ांविषयी प्रश्न विचारला. त्यावर मोदींनी आठवणींना उजाळा दिला. लग्न समारंभात शहनाई वाजवणाऱ्या  समोर चिंचा घेऊन मी उभा राहत असे. त्यामुळे शहनाईवादकाच्या तोंडाला पाणी सुटे व त्याच्या वादनात व्यत्यय येई, अशी आठवण मोदी यांनी सांगितली. अन्य प्रश्नाच्या उत्तरात मोदी म्हणाले की, राजकारण हा व्यवसाय नाही. देशवासीयांनी तुम्हाला स्वीकारले की त्यांच्यासाठी केलेली कृती कष्ट वाटत नाही. देशवासीयांनी हृदयात जागा दिल्याची भावना अधिक काम करण्याची प्रेरणा देते.
शिक्षकांनो, तंत्रस्नेही व्हा
शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक अंगीकार केला पाहिजे. गुणवत्तेवरून कोणत्याही विद्यार्थ्यांशी भेदभाव न करण्याचा सल्ला मोदींनी शिक्षकांना दिला. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानापासून दूर ठेवणे म्हणजे सामाजिक अपराध असल्याचे मोदी म्हणाले.