News Flash

शिष्यवृत्ती अर्जावर ‘तृतीयपंथी’ ओळखीचा स्वतंत्र रकाना

परीक्षा किंवा शिष्यवृत्ती अर्जावर आतापर्यंत केवळ पुरूष किंवा स्त्री या दोन पर्यायांमध्ये अडकलेली ओळख यापुढे ‘तृतीयपंथी’ रकान्यातून स्वतंत्रपणे

| November 2, 2014 04:33 am

परीक्षा किंवा शिष्यवृत्ती अर्जावर आतापर्यंत केवळ पुरूष किंवा स्त्री या दोन पर्यायांमध्ये अडकलेली ओळख यापुढे ‘तृतीयपंथी’ रकान्यातून स्वतंत्रपणे करून देण्याची संधी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
‘विद्यापीठ अनुदान आयोगा’च्या (यूजीसी) निर्देशांनुसार सर्व शिष्यवृत्ती योजना तृतीयपंथी विद्यार्थ्यांनाही लागू करण्यात याव्या, असे परिपत्रक नुकतेच विद्यापीठाने आपल्या संलग्नित महाविद्यालये, विभाग, संस्था आदींच्या प्रमुखांना पाठविले आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या प्रवेश, परीक्षा, शिष्यवृत्ती, फेलोशिपचे अर्ज यांवर हा बदल करण्यात येणार आहे. ‘तसे तृतीयपंथी विद्यार्थी आधीही विद्यापीठाच्या व यूजीसीच्या विविध योजनांचे लाभधारक ठरत होते. मात्र, त्या करिता त्यांना स्वत:ची ओळख केवळ ‘स्त्री’ अथवा ‘पुरूष’ या दोन रकान्यांपैकी एकामध्ये ‘योग्य’ची खूण करून करून द्यावी लागत असे. मात्र, यूजीसीच्या निर्देशांमुळे या विद्यार्थ्यांना स्वतंत्र रकाना उपलब्ध करून द्यावा लागणार आहे,’ असे विद्यापीठाचे कुलसचिव एम. ए. खान यांनी सांगितले. या संबंधात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा आधार देत यूजीसीचे सचिव प्रा. जसपाल संधू यांनी एप्रिल, २०१४मध्ये विद्यापीठांना नोटीस पाठविली होती. तिचा आधार घेत मुंबई विद्यापीठाने आपल्या सर्व महाविद्यालयांना व विभाग-संस्थांना सूचना देणारे परिपत्रक १ नोव्हेंबर रोजी काढले आहे. अर्थात हा बदल २०१४-१५च्या यापुढील परीक्षांपासून लागू राहील, असेही खान यांनी स्पष्ट केले.या बदलांमुळे तृतीयपंथीयांना आपली स्वतंत्र ओळख जपण्याचा अधिकार मिळणार आहे. तसेच, राज्यघटनेने त्यांना लागू केलेले कायदे, अधिकार मिळविणे सोपे जाणार आहे. काही विद्यापीठे तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे काही फायदेही उपलब्ध करून देते.
सध्या माहिती नाही
‘सध्या कोणतेही विद्यापीठ वा महाविद्यालय तृतीयपंथी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत नाही. केवळ त्यांना अर्ज करताना ‘स्त्री’ अथवा ‘पुरूष’ या दोहोंपैकी कुठल्याही एका पर्यायामध्ये आपली ओळख स्पष्ट करावी लागते. त्यामुळे, सध्या विद्यापीठांकडे त्यांच्याकडे शिकणाऱ्या तृतीयपंथी विद्यार्थ्यांची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. परंतु, परीक्षा अर्जावर ही माहिती उपलब्ध झाल्यास त्या संदर्भात खात्रीलायक माहिती जमा होऊ शकेल,’ असे मुंबई विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2014 4:33 am

Web Title: scholarships for third gender candidates in mumbai university
टॅग : Scholarships
Next Stories
1 कठोर कष्ट हाच शाश्वत यश मिळविण्याचा मार्ग
2 शाळेतच ‘करिअर’ घडणार!
3 ठाण्यात आज ‘मार्ग यशाचा’
Just Now!
X