वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या आर्थिक दुर्बल प्रवर्गातील (ईबीसी) विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी अनुदान अपुरे पडत असल्याने काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली नसल्याची कबुली वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी विधानपरिषदेत दिली. त्यानंतर या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये सुमारे ३० कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले.
वैद्यकीयच्या अनेक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती गेली तीन वर्षे रखडली असून सरकारकडे निधीच नसल्याचा प्रश्न सतीश चव्हाण, अमरसिंह पंडित आदींनी उपस्थित केला होता. ही शिष्यवृत्ती देण्यासाठी सुमारे ४५ कोटी रुपयांची तरतूद आवश्यक असताना केवळ सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. तेव्हा अनुदान अपुरे पडत असल्याने काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली नसल्याचे आव्हाड यांनी सभागृहास सांगितले.