नियम तोडणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची मागणी
शाळांची प्रवेश प्रक्रिया जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात राबविण्यात यावी असे शासनाचे आदेश असतानाही मुंबईतील काही शाळांनी प्रवेश प्रक्रिया सुरू केल्या आहेत. याचबरोबर शाळांनी वयाचे निकषही धाब्यावर बसविले आहेत. अशा शाळांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शाळांची प्रवेश प्रक्रिया एकाच वेळी राबविली जाऊन सर्व विद्यार्थ्यांना त्यात सहभागी होता व्हावे, यासाठी शासनाने प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शाळा-प्रवेश प्रक्रिया जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात व्हावी असे आदेश देण्यात आले आहेत. असे असतानाही नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातच काही शाळांनी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे.
यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा दावा करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने अशा शाळांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासाठी मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसेचे उपाध्यक्ष व मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेचे माजी सदस्य सुधाकर तांबोळी, उपाध्यक्ष अखिल चित्रे, चेतन पेडणेकर, संतोष गांगुर्डे, परशुराम तपासे आदींनी
शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांची भेट घेऊन शाळांवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन केले आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांचे वयाचे निकषही नियमानुसार पाळले जात नसून ते पालकांवर लादले जात असल्याची बाबही मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी चव्हाण यांच्या लक्षात आणून दिली. यानुसार चव्हाण यांनी पुण्यातील संचालक कार्यालयाला पत्र लिहून या प्रकरणी योग्य ते आदेश देण्याची विनंती केली आहे.