शाळेतील नोकऱ्या टिकविण्यासाठी येनकेन प्रकारेण विद्यार्थ्यांचा पुरेसा पट दाखविण्यात बहुतेक संस्थाचालक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना मुंबईतील एक ध्येयवादी शिक्षणतज्ज्ञ त्यांच्या शाळेत पुरेसे विद्यार्थी नसल्याने गेली तीन वर्षे चक्क मान्यता रद्द करण्यासाठी शासन दरबारी अर्ज विनंत्या करीत आहेत. त्यासाठी वेळोवेळी शाळेतील अपुऱ्या पटसंख्येचे पुरावेही जोडत आहेत. मात्र संस्था चालकांचा शाळा बंद करण्याबाबतचा स्पष्ट ठराव असूनही कागदी घोडे नाचविण्यापलिकडे शिक्षण विभागाने अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाहीच, उलट संस्थेच्या अध्यक्षांना संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी तुमची शाळा प्रथम दर्जाची असल्याचा तोंडी निर्वाळा दिला आहे. रात्र शाळेतील हा शैक्षणिक अंधार पाहून शाळा विद्यार्थ्यांसाठी की शिक्षक,कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी असा प्रश्न गेली ५० वर्षे अध्ययन क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या ८३ वर्षीय नलिनी शहाणे यांना पडला आहे. कारण प्रत्यक्षात हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकीच विद्यार्थी संख्या असणाऱ्या या शाळेला शासन वार्षिक तब्बल १८ लाख रूपयांचे अनुदान देत असून मुख्याध्यापक, तीन शिक्षक, कारकून,शिपाई असा कर्मचारी वर्ग आहे.  
 धारावीत पद्मभूषण डॉ. धनंजय कीर शिक्षण संस्थेची सावित्रीबाई फुले मुलींची माध्यमिक रात्र शाळा आहे. १९६० ते १९९६ या काळात दादर भागात असणारी पूर्वाश्रमीची बेसिक एज्युकेशन ट्रस्टची भारतीय गर्ल्स हायस्कूल ही शाळा नंतर तिथे विद्यार्थिनींची संख्या कमी झाल्यामुळे माटुंगा लेबर कॅम्पमध्ये स्थलांतरीत करण्यात आली. संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा नलिनी शहाणे यांनी १९७१ ते १९८९ अशी अठरा वर्षे मुंबई महापालिकेच्या शाळेतील नोकरी सांभाळून या रात्र शाळेतही शिकविले. ज्येष्ठ चरित्रकार डॉ. धनंजय कीर यांनी १९७० नंतर या संस्थेच्या कारभारात लक्ष घालून शाळेचा व्यवहार पारदर्शी आणि चोख केला. त्यांच्याच इच्छेनुसार नलिनी शहाणे निवृत्तीनंतरही विश्वस्त म्हणून संस्थेत कार्यरत राहिल्या. २०१० पासून मुलींचा पुरेसा पट नसल्याने शासनाने आता ही शाळा बंद करावी, यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.

हे तर चांगल्याचे लक्षण..
प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहणारी मुले रात्रशाळेत येतात. आता काळानुरूप रात्र शाळेतील विद्यार्थीनींची संख्या कमी कमी होत गेली आहे. नलिनी शहाणेंच्या मते हे चांगल्याचे लक्षण आहे. कारण मुलींना रात्रशाळेत यावे लागणे हे कोणत्याही समाजासाठी भूषणावह नक्कीच नाही. मात्र जेमतेम दहा-बारा विद्यार्थिनीच असणारी आमची शाळा चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे मत असेल तर वाईट शाळांची परिस्थिती काय असेल, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

पण तरीही शाळा सुरूच..
संस्थेच्या अध्यक्षा या नात्याने दस्तूरखुद्द नलिनी शहाणे गेली तीन वर्षे शासन दरबारी अपुऱ्या हजेरीपटाच्या पुराव्यांसह पत्र व्यवहार करूनही शाळा अद्याप सुरूच आहे. गेल्या ५ डिसेंबरला त्यांनी शाळेस भेट दिली. तेव्हा आठवीच्या वर्गात पाच, नववीच्या वर्गात चार तर दहावीच्या वर्गात अवघ्या दोन अशा एकूण फक्त ११ मुली होत्या. विशेष म्हणजे मध्यंतरी करण्यात आलेल्या पट पडताळणी अभियानाच्या नजरेतूनही ही बोगस हजेरी सुटली आहे. अर्धशतकांहून अधिक काळ अध्यापन क्षेत्रात कार्यरत नलिनी शहाणेंचा शिक्षण क्षेत्रातील या भोंगळ कारभारामुळे पुरता भ्रमनिरास झाला आहे.