स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, प्रामाणिकपणा ही तत्त्वे पाळणारा, पर्यावरणस्नेही, कलासक्त, श्रमप्रतिष्ठेचे मोल जाणणारा, ज्ञानपिपासू विद्यार्थी व शिक्षक घडविणे हे ठाण्यातील ‘वर्तकनगर शिक्षण मंडळ’ संचालित ‘सावित्रीदेवी थिराणी विद्यामंदिर’चे स्वप्न आहे. हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी शाळा विविध उपक्रमांचे आयोजन करते. त्यापैकी काही उपक्रमांची ओळख.

ठाणे शहराच्या वर्तकनगर परिसरात ही शाळा आहे. शाळेत ९० टक्के विद्यार्थी आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील आहेत. मराठी माध्यमाची असूनही विविध उपक्रमांमुळे शाळेतील विद्यार्थी संख्या दरवर्षी वाढते आहे. शाळेचे काही उपक्रम थोडक्यात असे.
भावपूर्ण गुरुपौर्णिमा – गुरूप्रती आदर व्यक्त करण्यासाठी प्रतिवर्षी शाळेतील विद्यार्थी स्वत: तयार केलेली कापडी पिशवी प्रत्येक शिक्षक-कर्मचाऱ्याला भेट देतात. पिशवीसोबत कधी श्रीफळ तर कधी स्वलिखित पत्र, कविता, सुवचन गुरूंना भेट देण्यात येते.
वृक्षबंधन – वृक्ष माझा सखा, वृक्ष माझा सोबती असे तत्त्व अंगीकारणारे आमच्या शाळेचे विद्यार्थी प्रत्येक राखीपौर्णिमेला शालेय परिसरातील वृक्षांना राखी बांधतात. शालेय परिसरात १७४ झाडे आहेत. या प्रत्येक झाडाची काळजी विद्यार्थी घेतात. चुकूनही झाडाचे पान किंवा फूल, फळे विद्यार्थ्यांकडून तोडले जात नाही. ठाणे शहरात रस्ता रुंदीकरणात नामशेष होणारी नारळाची २० झाडे शालेय परिसरात क्रेनच्या साहाय्याने आणली गेली व त्यांची लागवड केली गेली. अभिमानाची बाब म्हणजे ती सर्व झाडे मोठय़ा डौलाने परिसरात वाढत आहेत.
बोलकी फळे व भिंती – शालेय कुंपणाच्या भिंतीवर पर्यावरणपूरक, नैतिक मूल्यदर्शक विविध सुविचारांचे लेखन प्रत्येक वर्षी पावसाळा संपल्यानंतर विद्यार्थी करतात. त्याला अनुसरून चित्रेही काढतात. तसेच शाळेच्या इमारतीत प्रत्येक मजल्यावर असलेले फळे विविध मजकुरांनी भरलेले असतात. त्यांचे संकलन, लेखन विद्यार्थी शिक्षकांच्या मदतीने करतात. दर आठवडय़ाला एक वर्ग शाळेच्या पॅसेजमधील शोकेस सजावटीत भाग घेतो. टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करून किंवा एखाद्या विशिष्ट पदार्थापासून तयार केलेल्या वस्तू या शोकेसमध्ये लावल्या जातात.
आजचा शब्द – मराठी, हिंदी, इंग्रजी विषयातील शब्दसंपत्ती वाढावी म्हणून रोजचा एक शब्द शाळेच्या प्रथमदर्शनी फलकावर मराठीत लिहिला जातो. त्याचेच हिंदी व इंग्रजी समानार्थी शब्द पुढे लिहिले जातात. लोकसंख्या इशारा दिनानिमित्त घेतलेल्या घोषवाक्य स्पर्धेतील एक घोषवाक्य दररोज फलकावर लिहिले जाते.
विविध गुणदर्शन –  विद्यार्थी-शिक्षकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उदा. जाहिरात तयार करणे, रवींद्रनाथ टागोरांच्या कवितांचे वाचन, कथाकथन स्पर्धा, पथनाटय़, बालनाटय़ लिहिणे व सादर करणे, मुलाखत घेणे, गीतगायन, काव्यगायन, लोकगीत गायन स्पर्धा इत्यादी.
विज्ञान प्रदर्शन – शाळेच्या दुसऱ्या सत्रात स्वतंत्र विज्ञान प्रदर्शन भरविले जाते. शाळेचे नावीन्यपूर्ण विषयावरील विज्ञान प्रकल्प अनेकदा जिल्हा, राज्य स्तरावर निवडले गेले आहेत. तसेच राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत शाळेचे संशोधन प्रकल्प राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले गेले आहेत. या केसात दडलंय काय, इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची समस्या, फिरती प्रयोगशाळा, सॅनिटरी नॅपकीनची समस्या व त्यावरील उपयायोजना आदी विद्यार्थ्यांनी तयार केलेल प्रकल्प आतापर्यंत नावाजले गेले आहेत.
नावीन्याचा ध्यास – विद्यार्थी-शिक्षकांना नवनवीन माहिती उपलब्ध करून देण्यासाठी तज्ज्ञांची व्याख्याने, शिक्षकांसाठी एक दिवसाचे प्रशिक्षण शाळा सतत आयोजित करीतच असते. याच प्रेरणेतून आठवीपासून एका वर्गासाठी फ्रेंच भाषा शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. शाळेच्या पर्यावरणवादी उपक्रमांमुळे गेली तीन वर्षे सातत्याने शाळेला ‘महाराष्ट्र प्रदूषण मंडळा’तर्फे आदर्श पर्यावरणस्नेही शाळेचा प्रथम पुरस्कार मिळत आहे.

Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान