उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा आज सोमवारपासून पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्षांची सुरुवात उत्साहात व्हावी यासाठी शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत गोड पदार्थानी केले जाणार आहे. इतकेच नव्हे तर शिक्षणमंत्रीही विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. राज्यात सध्या एकूण एक लाख तीन हजार ६८५ शाळा आहेत. यापैकी ६७ हजार ७१७ शाळा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत. विदर्भ वगळता राज्यातील इतर ठिकाणच्या शाळांमध्ये सोमवारी प्रवेशोत्सव साजरा होणार आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मुंबईतील अनेक शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी रविवारीच तयारी करून ठेवली. विदर्भातील शाळा २६ जून रोजी सुरू होणार आहेत. शाळेचा पहिला दिवस चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन राज्यात प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे सोमवारी सकाळी दादर येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते मुंबई महापालिकेच्या ४५० शाळांमधील विद्यार्थ्यांशी आभासी अभ्यासवर्गाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. दादर पूर्व येथे पालिकेने सुरू केलेल्या आभासी अभ्यासवर्गाचे मुख्य केंद्र आहे.