नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे कारण देत ३० ऑगस्टला प्राध्यापकांकरिता होणारी ‘सेट’ ही पात्रता परीक्षा पुढे ढकलून ६ सप्टेंबरला घेण्यात येणार असली तरी या दिवशी गोपाळकाला आल्याने परीक्षार्थी उमेदवारांच्या त्रासात भरच पडणार आहे. केवळ याच नव्हे तर गेल्या पाच-सहा सेट परीक्षांदरम्यान आयोजनात नियमितता नसणे, निकाल लांबविणे अशा कितीतरी अडचणींना उमेदवारांना तोंड द्यावे लागले आहे. त्यामुळे, या परीक्षेच्या आयोजनातील सावळागोंधळ दूर करण्याची मागणी होते आहे.
खरेतर ‘स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट’चे (सेट) ही परीक्षा वर्षांतून दोन वेळा घेणे बंधनकारक आहे. परंतु, पुणे विद्यापीठाने १३ डिसेंबर, २०१३ला घेतलेली सेट परीक्षा शेवटची ठरली. त्यानंतर सेटचे आयोजन थेट ३० ऑगस्ट, २०१५ला करण्यात आले होते. तसेच, गेल्या पाच-सहा परीक्षांचे निकालही सात सात महिने लांबल्याने या परीक्षेच्या आयोजनातील ढिसाळपणाबाबत उमेदवारांमध्ये नाराजी आहे.
आता कुंभमेळ्यादरम्यान होणाऱ्या शाही स्नानामुळे परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्याचे कारण देत ३० ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलून ६ सप्टेंबरला ठेवण्यात आली. परंतु, मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी गोपाळकाल्याच्या दिवशी वाहतूक कोंडीचे प्रकार होतात. त्यामुळे, परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यात अडचण येण्याची शक्यता आहे, अशी तक्रार प्रहार विद्यार्थी संघटनेचे अ‍ॅड. मनोज टेकाडे यांनी केली. हीदेखील परीक्षा उमेदवारांच्या सोयीसाठी पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वर्षांतून दोनदा परीक्षा घ्याव्यात.
त्याचप्रमाणे परीक्षेच्या आयोजनात सुसूत्रता आणावी. निकाल ४५ दिवसांच्या आत जाहीर करावे. आणि वर्षांतून दोन वेळा ही परीक्षा घेण्यात यावी. त्यासाठीच्या तारखा आधीच जाहीर करायात, अशी मागणी संघटनेचे अजय तापकीर यांनी केली आहे.
या वादाच्या पाश्र्वभूमीवर परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळ वाढवून मिळण्याची शक्यता असून परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्याची शक्यता कमीच आहे.