पालिका शाळांमधील इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांपासून लैंगिक शिक्षण देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. किशोरवयातील मुला-मुलींमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल, प्रसूती, प्रजनन आदींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
पालिका शाळांतील किशोरवयीन विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाबाबत शास्त्रीयदृष्टय़ा माहिती द्यावी, अशी मागणी शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे केली होती. वैद्यकीय अधिकारी (शाळा) विभागातर्फे पालिका शाळांतील इयत्ता नववीमधील विद्यार्थ्यांना १९९२-९३ मध्ये लोकसंख्या शिक्षण, किशोरवयांतील शारीरिक व मानसिक बदल, एड्स प्रतिबंध कार्यक्रम आदींबाबत मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली होती. पालिका शाळांतील निवडक शिक्षकांना वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्रशिक्षणही देण्यात आले होते. मात्र २००५ दरम्यान काही कारणास्तव या कार्यक्रमाला खीळ बसली आणि पालिका शाळांमधील लैंगिक शिक्षणाचे धडेही बंद पडले. आता काळाची गरज ओळखून पुन्हा एकदा पालिकेच्या शिक्षण विभागाने आपल्या शाळांमधील इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा लैंगिक शिक्षणाचे धडे देण्याचा निर्णय घेतला आहे. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांमध्ये शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका शाळांमधील काही शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून गुरुवारच्या बैठकीत देण्यात आली.