राज्यातील अभियांत्रिकीच्या जवळपास साठ हजार जागा रिक्त जागांवर मराठा आणि मुस्लीम वर्गातील विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याची सूचना तंत्रशिक्षण विभागाने शनिवारी जाहीर केली आहे. त्यामुळे महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांचा गोंधळ मात्र वाढला आहे.
मराठा आणि मुस्लीम आरक्षण जाहीर झाले, त्या वेळी अभियांत्रिकी, व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेशप्रक्रिया सुरू होत्या. नियमानुसार आरक्षणाबाबतची सूचना प्रवेश परीक्षेपूर्वी देणे आवश्यक असल्याने या वर्षी या वर्गाना आरक्षणाचे लाभ मिळणार नाहीत, हे स्पष्ट झाले होते. त्याप्रमाणे आरक्षणाच्या जुन्याच नियमांनुसार केंद्रीय प्रवेशप्रक्रिया राबवण्यात आली. मात्र, आता केंद्रीय प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मराठा आणि मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणातून प्रवेश देण्याची सूचना तंत्रशिक्षण संचालनालयाने संकेतस्थळावर जाहीर केल्याने गोंधळात भर पडली आहे.
राज्यात केंद्रीय प्रवेशप्रक्रियेनंतर अभियांत्रिकीच्या ६१ हजार २३४ जागा रिक्त आहेत. या जागांवरील हे प्रवेश आरक्षणाच्या नव्या नियमांनुसार महाविद्यालयांनी करायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना खुल्या वर्गातून प्रवेश मिळू शकला नाही, त्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा आणि विद्यार्थी महाविद्यालयांकडे वळावेत यासाठी हे आरक्षण देण्यात येत असल्याचे तंत्रशिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
तंत्रशिक्षण विभागाची संदिग्ध सूचना आणि सोशल इंजिनिअरिंगच्या या अनोख्या प्रयोगामुळे महाविद्यालयांमध्ये मात्र गोंधळाचे वातावरण आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये रिक्त जागा नाहीत, त्या महाविद्यालयांमध्येही तंत्रशिक्षण विभागाची सूचना दाखवत विद्यार्थ्यांनी धाव घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र, महाविद्यालयांना याबाबत विभागाकडून कोणतीही अधिकृत सूचना मिळाली नसल्याचे महाविद्यालयांच्या प्राचार्यानी सांगितले.