आयआयटीच्या कॅम्पसमध्ये प्रवेश घेताच, विद्यार्थ्यांना सायकल विकत घ्यावी लागते. कारण इथल्या भल्यामोठय़ा कॅम्पसमध्ये वावरायचे तर स्वयंचलित वाहनाला पर्याय नाही. अर्थात सुरुवातीला मोठय़ा कौतुकाने घेतलेल्या या सायकलचा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर झाल्यानंतर मात्र फारसा काही उपयोग होत नाही. म्हणूनच ‘आयआयटी’च्या डोकेबाज विद्यार्थ्यांनी एक शक्कल शोधली आहे. त्यांनी तयार केलीय अशी एक सायकल जी कॅम्पसमधल्या प्रत्येकाची असेल. तिला कुलूप नाही. शिवाय ती वजनानेही अगदी हलकी आहे. ही सायकल राइड मात्र केवळ कॅम्पसपुरतीच मर्यादीत राहील.
‘आयआयटी’च्या नियमांनुसार कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना बाइक आणि कार चालवण्यावर बंदी आहे. पण इथल्या अवाढव्य कॅम्पसमध्ये फिरण्यासाठी हाताशी एखादे तरी वाहन असणे विद्यार्थ्यांना गरजेचे असते. यामुळे विद्यार्थ्यांने  प्रवेश घेतला की त्याला कॅम्पसमध्ये ये-जा करण्यासाठी एक सायकल विकत घ्यावीच लागते. पण इथले शिक्षण आणि वास्तव्य संपले की ही सायकल बिनकामाची किंवा एक अडचण होऊन जाते. म्हणूनच ‘आयआयटी’ कॅम्पसमधील इंडस्ट्रीअल डिझायिनग सेंटरमधील विद्यार्थ्यांनी एक कमी वजनाची सायकल तयार केली आहे.  
अल्विन गोपाल या विद्यार्थ्यांने ही संपूर्ण सायकल स्वत तयार केली आहे. नेहमीच्या सायकलमध्ये असलेल्या लोखंडाऐवजी त्याने या सायकलसाठी अल्युमिनीअमचे रॉड वापरले आहेत. त्यामुळे तिचे वजन कमालीचे कमी झालं आहे. शिवाय या सायकलला वेग येण्यासाठी हँड गीयर्सही दिलेले आहेत.
या सायकलसाठी वेगवेगळे स्टँडस असतील. तुम्ही कोणत्याही स्टँडवरची सायकल उचलून वापरु शकता. फक्त तुम्ही हव्या त्या ठिकाणी पोहोचलात आणि तुमचे काम संपले की ती परत स्टँडवर आणून ठेवण्याची जबाबदारी मात्र तुम्हाला घ्यावी लागेल. ही सायकल फक्त आणि फक्त कॅम्पसमध्येच वापरता येऊ शकेल. पण त्याचमुळे ती चोरीला जाण्याचे धोकेही कमी आहेत.
ही सायकल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ‘आयआयटी’ला अनामत रक्कम द्यावी लागेल. ही रक्कम शिक्षण पूर्ण झाल्यावर परत घेता येईल. हा प्रस्ताव ‘आयआयटी’ प्रशासनाकडे सादर केला असून आहे.
सायकलचे फायदे
*वजनाने हलकी आहे.
*कुलूप लावावे लागत नाही.
*कॅम्पसमध्ये कुठेही वापरू शकता.
*विकत घ्यावी लागणार नसल्याने पशाचीही बचत