मराठी अभ्यास केंद्रातर्फे ८ व ९ डिसेंबर असे दोन शिक्षणविषयक पुस्तकाचे प्रकाशन, पालकांशी सुसंवाद या विषयाबाबत परिसंवाद, प्रयोगशील मराठी शाळांच्या वैशिष्टय़पूर्ण उपक्रमांची माहिती देणारा कार्यक्रम अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, ८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता ‘शिक्षणाचे मराठी माध्यम : अनुभव आणि अस्वस्थ वर्तमान’ या पुस्तकाचे प्रकाशन महापौर सुनील प्रभु यांच्या हस्ते केले जाणार आहे. बी. डी. डी चाळ सर्वेक्षण अहवाल आणि पालकांच्या निवडक मनोगतांचे संकलन याचा या पुस्तकात समावेश आहे.
 रविवारी सकाळी १० वाजता ‘मुलांच्या शिक्षणाबाबत पालकांशी सुसंवाद’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यात  होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे विजय लाळे, शिक्षणतज्ज्ञ अरूण ठाकूर व पत्रकार विनायक पात्रुडकर सहभागी होणार आहेत.
रविवारी दुपारी २ वाजता प्रायेगशील शाळा आणि मुंबईतील मराठी शाळा : आदान-प्रदान हा कार्यक्रम होणार आहे. यात ऐना येथील ग्राममंगल, बदलापूरची गुरूकुल, पुण्याची अक्षरनंदन, वांद्रे येथील महात्मा गांधी विद्यामंदिर, गोरेगावस्थित नंदादीप, दापोलीतील लोकमान्य टिळक विद्यामंदिर या प्रयोगशील शाळांचे प्रतिनिधी सहभागी होतील. शिरूरचे रवींद्र धनक या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.
दोन दिवसांच्या या विशेष कार्यक्रमाच्या समारोप समारंभाला मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रभारी कार्यक्रम प्रमुख अतुल साळुंखे, अभिनेता भूषण कडू उपस्थित राहतील. या वेळी संगीतकार कौशल इनामदार मराठी अभिमान गीत सादर करणार आहेत.
 दोन दिवसांचे हे कार्यक्रम ललित कला केंद्र, जांबोरी मैदान, वरळी येथे होणार आहेत. दोन्ही दिवस विविध मराठी प्रयोगशील शाळांच्या शैक्षणिक साधनांचे प्रदर्शन, मुलांसाठी पुस्तक प्रदर्शन ठेवण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी महेंद्र डोंगरे (९८२१३५०२३३), साधना गोरे (८६५२६१०१८३) यांच्याशी संपर्क साधावा.     
कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या शाळा
ऐना येथील ग्राममंगल, बदलापूरची गुरूकुल, पुण्याची अक्षरनंदन, वांद्रे येथील महात्मा गांधी विद्यामंदिर, गोरेगावस्थित नंदादीप, दापोलीतील लोकमान्य टिळक विद्यामंदिर या प्रयोगशील शाळांचे प्रतिनिधी सहभागी होतील.