19 October 2018

News Flash

राज्यात ५ हजार शाळांमध्ये स्पोकन इंग्लिशचा प्रयोग

ग्रामीण भागात इंग्रजी न आल्याने विद्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड तयार होतो.

नवीन शैक्षणिक वर्षांत राज्यातील ५ हजार शाळांमध्ये स्पोकन इंग्लिश प्रयोग सुरू केला जाणार आहे. या उपक्रमासाठी इच्छूक शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. पूर्वी ब्रिटिश कौन्सिलकडून प्रशिक्षण देऊनही शिक्षकांनी याकडे लक्ष दिले नव्हते. याचा अर्थ पूर्वी प्रशिक्षणात काही तरी दोष राहिले होते. त्या त्रुटी दूर करण्यासाठी कशा प्रकारचे प्रशिक्षण देता येईल, याचा विचार करण्याची औरंगाबाद येथे मंगळवारी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांची उपस्थिती होती.

ग्रामीण भागात इंग्रजी न आल्याने विद्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड तयार होतो. तो घालविण्यासाठी पहिलीपासून इंग्रजीचा प्रयोग राज्यात काही अंशी यशस्वी ठरला. मात्र, इंग्रजीतून ‘ऱ्हाइम्स’ म्हणण्यापुढे अभ्यासक्रमाचा फारसा उपयोग झाला नाही. आता संवाद पातळीवर विद्यार्थ्यांंनी उतरावे, या साठी स्पोकन इंग्लिशचा प्रयोग हाती घेतला जाणार आहे. रोज वापरात असणारे काही शब्द आणि बोलण्याइतपत इंग्रजी कसे शिकवावे याच्या पाच पद्धती निवडण्यात आल्या आहेत. कोणत्याही पद्धतीतून मुलांना शिकवून किमान इंग्रजीतून बोलू शकेल, अशी अध्ययन-अध्यापन पद्धती विकसित करावी, असे आवाहन नंदकुमार यांनी या वेळी केले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक गोविंद नांदेडे आदींची उपस्थिती होती. या वेळी राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांनी इंग्रजी सुधारण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमांची माहिती सादर केली. कार्यशाळेत शिक्षकांनी इंग्रजीतून सादरीकरण केले. काही शिक्षकांनी इंग्रजीतील शब्दसंख्या पुरेशी माहीत नाही, अशी प्रांजळ कबुली देऊन इंग्रजी अध्यापन कसे करतो, हे प्रधान सचिवांना सांगितले.

राज्यात या वर्षी किमान ५ हजार शाळांमध्ये हा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. येत्या काळात जिल्हा परिषदेच्या शाळेतही चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत असल्याचा संदेश पोहोचेल, असा विश्वास नंदकुमार यांनी व्यक्त केला. नवीन शैक्षणिक वर्षांत मूल शाळाबाहय़ राहणार नाही, याची दक्षताही घेतली जाणार आहे. शाळाबाहय़ मुलांचे केवळ सर्वेक्षण करून भागणार नाही तर त्यांना शाळेत दाखल करणे हा प्राधान्यक्रम असेल, असेही नंदकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

First Published on May 11, 2016 1:45 am

Web Title: spoken english experiment maharashtra school