वस्तुनिष्ठ चुकांबरोबरच नकाशांमधील व व्याकरणातील अक्षम्य चुका, अशुद्ध लेखन यामुळे गेल्या वर्षी वादग्रस्त ठरलेल्या दहावी इतिहास व भूगोलाच्या पाठय़पुस्तकांमध्ये सुधारण्या करण्याचे काम बरेच रेंगाळले आहे. या पुस्तकांतील नकाशांना ‘सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’कडून अद्याप हिरवा कंदील न दिल्याने छपाईचे कामही सुरू झालेले नाही. त्यामुळे यावर्षी ही पुस्तके जूनमध्ये, थेट शाळा सुरू झाल्यानंतरच बाजारात येण्याची शक्यता असून याचा फटका आतापासूनच दहावीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना बसणार आहे.
गेल्या वर्षी नव्या अभ्यासक्रमासह आणल्या गेलेल्या दहावीच्या भुगोलाच्या पुस्तकात ‘भारत व सभोवतालची राष्ट्रे’ या नकाशात अरुणाचल प्रदेश भारताबाहेर दाखविण्यात आला. तर, इतिहासातील भारताच्या नकाशात अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटेच दाखवण्यात आली नव्हती. याशिवाय या दोन्ही पुस्तकांमध्ये अनेक चुका, व्याकरणातील दोष आढळून आले होते. याबद्दल गवगवा झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दोन्ही विषयांची पाठय़पुस्तक मंडळे बरखास्त करून स्वत:च हे काम हाती घेतले. तसेच इतिहास-भूगोलातील सुमारे ६० नकाशे ‘सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’च्या मान्यतेकरिता देहरादून येथील केंद्रात पाठविण्यात आले आहेत. मात्र, हे नकाशे पाठवून महिना उलटला तरी त्यावर मान्यतेची मोहोर उमटलेली नाही.
आता तर ‘बालभारती’कडील साठाही संपल्याने बाजारात जुनी पाठय़पुस्तकेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे, इतिहास-भूगोलाची पाठय़पुस्तके बाजारात येणार कधी या प्रतीक्षेत सध्या विद्यार्थी आहेत.

भूगोलाचा प्रादेशिक दृष्टीकोन कायमच
भारताचा भूगोल प्रादेशिक दृष्टीकोनातून मांडणाऱ्या भूगोलाच्या संपूर्ण पाठय़पुस्तकावरच तज्ज्ञांचा आक्षेप आहे. हे संपूर्ण पुस्तकच प्रादेशिक दृष्टीकोनातून तुकडय़ातुकडय़ाने मांडण्याऐवजी हवामान, पीक, खनिजे, नद्या, रस्ते-दळणवळण आदी एकात्मिकपणे नव्याने लिहिण्याची मागणी तज्ज्ञांकडून होते आहे. पण, मंडळाने ही मागणी फेटाळली आहे.