परीक्षा अर्जाच्या ‘प्रोग्रॅमिंग’मध्ये गडबड झाल्याने दहावी परीक्षेच्या ओळखपत्रांना विलंब झाला असून आणखी दोन आठवडे तरी ओळखपत्रे विद्यार्थ्यांच्या हातात पडण्याची शक्यता नाही. मुंबईत अजून ४० हजार विद्यार्थ्यांची सुधारित ‘ओळखपत्र पूर्व-यादी’ (प्री-लिस्ट) शाळांकडून येणे बाकी आहे.
परीक्षांसाठी ओळखपत्रे तयार करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी भरून दिलेल्या परीक्षा अर्जाचे स्कॅनिंग केले जाते. या स्कॅनिंग केलेल्या अर्जाचे प्रोग्रॅमिंग होऊन त्यानंतर ओळखपत्र पूर्व-यादी तयार केली जाते. ही यादी नंतर शाळांकडून तपासून घेतली जाते. शाळांनी तपासून सुधारणा केलेली यादी परत राज्य शिक्षण मंडळाकडे जाते. या यादीला मंडळाने अंतिम मान्यता दिल्यानंतर प्रत्यक्ष ओळखपत्र तयार केले जातात. पण, या वर्षी स्कॅन केलेल्या प्रवेश अर्जाच्या प्रोग्रॅमिंगमध्येच तांत्रिक गडबड झाल्याने ती निस्तारण्यात मंडळाचा बराच वेळ गेला. परिणामी ओळखपत्र पूर्व-यादी वेळेत तयार झाली. म्हणूनच यंदा दहावीची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा तोंडावर आली तरी विद्यार्थ्यांना ओळखपत्रे देण्यात मंडळाला यश आले नाही. परिणामी या दोन्ही परीक्षा ओळखपत्राशिवाय घेण्याची नामुष्की मंडळावर आली आहे. या विलंबामुळे अजुनही शाळांमध्ये पूर्व यादीत सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. मुंबईत ४० हजार विद्यार्थ्यांची पूर्व-यादी अद्याप त्या त्या शाळांकडून येणे बाकी आहे, असे मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांनी सांगितले. या शाळांकडून पूर्व यादी आल्यानंतर ती पुण्यात राज्य शिक्षण मंडळाकडे पाठवली जाईल. मंडळाने अंतिम मान्यता दिल्यानंतर ओळखपत्रे तयार करून शाळांना पाठविली जातील. परीक्षेपूर्वी ते विद्यार्थ्यांना उपलब्ध केले जाईल, असे पांडे यांनी सांगितले.