वैयक्तिक माहिती भरताना आपल्याला आपला पत्ता, दूरध्वनी (लॅण्ड लाइन व मोबाइल) व ई-मेल भरणे आवश्यक आहे. यामुळे फॉर्म भरल्यानंतर काही त्रुटी आढळल्यास किंवा आपला फॉर्म नीट ‘सबमिट’ किंवा ‘अप्रूव्ह’ झाला नसल्यास संपर्क करणे सोपे जाईल.

आता आपण उपलब्ध असलेली आरक्षणे कोणती ते पाहू या-
दोन प्रकारची आरक्षणे आहेत :
१) वैधानिक आरक्षण- ज्यात मागासवर्गीयांच्या बाबतीत शासनाने विहित केल्याप्रमाणे इतर मागासवर्ग (ओबीसी), १९ टक्के, अनुसूचित जाती (एससी) १३ टक्के, अनुसूचित जमाती (एसटी)- ७ टक्के, विमुक्त जाती- अ (व्ही.जे.ए.)- ३ टक्के, भटक्या जमाती- ब (एन.टी.बी.)- २.५ टक्के, भटक्या जमाती- क (एन.टी.सी.)- ३.५ टक्के, भटक्या जमाती- ड (एन.टी.डी.)- २ टक्के व विशेष मागास प्रवर्ग (एस.बी.सी.) २ टक्के यांचा समावेश होतो.
ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्य़ांच्या काही भागात या टक्केवारीत बदल आहे. याची माहिती आपल्याला माहिती पुस्तिकेत मिळेल.
वैधानिक आरक्षणाची एकूण टक्केवारी सगळ्या भागांत ५२ टक्के आहे. मात्र अल्पसंख्याक (धार्मिक किंवा भाषिक) संस्थांमध्ये ५२ टक्के वैधानिक आरक्षणाऐवजी ५० टक्के आरक्षण संबंधित अल्पसंख्याकांसाठी असेल. अल्पसंख्याक कोटय़ाचे प्रवेश हे ऑफलाइन पद्धतीने संबंधित संस्था स्तरावर शासनाने विहित केलेल्या कालावधीत होतील, तर वैधानिक आरक्षणाचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीनेच होतील.
वैधानिक आरक्षणावरील कोटय़ासाठी विद्यार्थ्यांकडे महाराष्ट्र शासनाने प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वैधानिक आरक्षणाचा लाभ महाराष्ट्राबाहेरील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणार नाही. एखाद्या विद्यार्थ्यांकडे जातीचे प्रमाणपत्र नसेल, पण त्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख असेल तरी अशा विद्यार्थ्यांना वैधानिक आरक्षणाचा लाभ मिळेल. मात्र अशा विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया संपल्यावर विहित मुदतीत जातीचे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे लागेल व प्रवेश मिळालेल्या संस्थेत सादर करावे लागेल.
वैधानिक आरक्षणात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरल्यावर व ‘सबमिट’ केल्यावर अर्ज ‘अप्रूव्ह’ करून घेण्यासाठी संबंधित प्रमाणपत्र घेऊन शाळेत किंवा मार्गदर्शन केंद्रावर जाणे अनिवार्य राहील.
(लेखक ऑनलाइन समितीचे सदस्य असून, भवन्स महाविद्यालयाचे सहउपप्राचार्य आहेत.)