बीड येथील आदित्य डेंटल महाविद्यालयामध्ये मूलभूत सुविधा व अनेक विषयांसाठी शिक्षक नसल्याची तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनींना स्टाफ क्वार्टरमध्ये कोंडून ठेवण्याची घटना मंगळवारी घडली.विद्यार्थिनींच्या पालकांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे या घटनेबाबत पत्रव्यवहार  करून तक्रार केली आहे. डेंटल काऊन्सिल ऑफ इंडियाकडेही या महाविद्यालयाची तक्रार करणार असल्याचे पालकांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. यापैकी बहुतांश पालक मुंबईचे आहेत.या महाविद्यालयाबाबत विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिजिओलॉजी आणि बायोकेमेस्ट्री या दोन विषयांचा एकही तास गेल्या तीन महिन्यांमध्ये झाला नाही. अ‍ॅनॉटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेम आणि डेंटल हिस्ट्री या विषयांचे एकही प्रात्यक्षिक झालेले
नाही.
वैद्यकीय अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मनुष्यदेहाच्या अभ्यासासाठी शवविच्छेदन करावे लागते. त्यासाठी या महाविद्यालयामध्ये गेल्या सहा वर्षांपासून एकच मृतदेह असून तो योग्य पद्धतीने ठेवण्यात न आल्यामुळे सडला आहे. त्याच मृतदेहावरून विद्यार्थ्यांना हा विषय शिकावा लागत आहे. त्याचबरोबर इतर पायाभूत सुविधाही नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती.
विद्यार्थ्यांनी सांगितले, ‘‘महाविद्यालयाची पाहणी करण्यासाठी पथक आले, त्या वेळी आमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना एमडीएस (मास्टर इन डेंटल सर्जरी) ची खोटी प्रमाणपत्रे देऊन, प्राध्यापक असल्याचे भासवण्यात आले. आमच्यावर विविध दबाव आणून हजारो खोटे केसपेपर तयार करवून घेतले.’’
महाविद्यालयाच्या गैरकारभाराबाबत धाडस दाखवून तक्रार करणाऱ्या या विद्यार्थिनींना महाविद्यालयाच्या प्रशासनाने मात्र स्टाफ क्वार्टर्समध्ये कोंडून ठेवले. या विद्यार्थिनींच्या पालकांनी सांगितले, ‘‘आमच्या मुलींनी महाविद्यालयाविरुद्ध तक्रार केली म्हणून वसतिगृहातून बाहेर काढून कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी ठेवले. दिवसभर त्यांच्यावर खूप दबाव आणला गेला. पालकांशी कोणत्याही प्रकारे चर्चा न करता या मुलींबाबत व्यवस्थापनाने परस्पर निर्णय घेतला. आम्ही महाविद्यालयाच्या विरोधात तक्रार करणार आहोत. लाखो रूपये शुल्क भरून आम्ही विश्वासाने या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. झाल्या प्रकाराने मुली घाबरल्या आहेत. त्यांची आता या महाविद्यालयामध्ये शिकण्याची तयारी नाही. महाविद्यालयाच्या मनमानीमुळे मुलींचे एक वर्ष वाया जाणार आहे आणि आमचे आर्थिक नुकसानही होणार आहे.’’ या महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षांला शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. त्यातील किमान सत्तर विद्यार्थ्यांनी ‘फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन’ या संस्थेकडे महाविद्यालयाबाबत तक्रार केली आहे. त्यामुळेच या विद्यार्थिनींवर कारवाई करण्यात आली, असे या विद्यार्थिनींनी सांगितले.