मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईच्या निषेधार्थ सोमवारी विद्यापीठातील प्राध्यापकांबरोबरच विद्यार्थीही रस्त्यावर उतरले. डॉ. हातेकर ज्या विभागात कार्यरत आहेत, त्या अर्थशास्त्र विभागातील त्यांच्या सहकारी प्राध्यापकांनीही तातडीची बैठक घेऊन या कारवाईचा निषेध केला आहे.
ही कारवाई अनाठायी होती, अशी तीव्र प्रतिक्रिया विद्यापीठात उमटली आहे. अर्थशास्त्राच्या विभागप्रमुख रितु दिवाण यांनी विभागातील प्राध्यापकांची सोमवारी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत डॉ. हातेकर यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला. ‘डॉ. हातेकर आमच्या विभागातील मान्यवर प्राध्यापक आहेत. विभागाची प्रतिष्ठा वाढविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे,’ असे नमूद करत त्यांनी डॉ. हातेकर यांच्यावरील कारवाई मागे घेण्याची विनंती विद्यापीठाला केली आहे. ‘डॉ. हातेकर यांच्यावर कारवाई करण्यापूर्वी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावणे आवश्यक होते. प्राध्यापकांसाठीच्या आचारसंहितेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्दय़ाशी हातेकर यांनी पुरेशी बांधिलकी दाखविली आहे. हे त्यांचे ‘नैतिक अध:पतन’ कसे काय ठरू शकते,’ असा सवाल अर्थशास्त्र विभागाचे माजी संचालक आणि विभागातील एक प्राध्यापक रोमार कोरिया यांनी व्यक्त केली.
या विभागातील विद्यार्थ्यांनी ‘युनिव्‍‌र्हसिटी कम्युनिटी फॉर डेमॉक्रसी अ‍ॅण्ड इक्व्ॉलिटी’ या (यूसीडीई) संघटनेअंतर्गत डॉ. हातेकर यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्ह विद्यापीठाच्या कलिना संकुलात मोर्चा काढला. इतर विभागातील विद्यार्थ्यांनीही या मोर्चात सहभागी होऊन आपला निषेध नोंदविला. ‘वी वॉन्ट हातेकर सर बॅक’चे फलक झळकावत विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. हातेकर यांचे निलंबन मागे न घेतल्यास आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी विद्यार्थ्यांनी दिला.
दुखावलेल्या डॉली सनी यांचा कारवाईला पाठिंबा
अर्थशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक डॉ. हातेकर यांच्यावरील कारवाईचा एकीकडे निषेध करीत असताना याच विभागातील एक प्राध्यापिका डॉली सनी यांनी मात्र या कारवाईचे समर्थन केले आहे. स्वत: सनी यांच्या विभागातील नियुक्तीसंदर्भात अनेक वाद आहेत. सनी यांच्या मार्गदर्शनाखाली शगुन श्रीवास्तव या विद्यार्थिनीने केलेली पीएचडी चर्चेचा विषय ठरली होती. या विद्यार्थिनीचा प्रबंध दोन्ही तज्ज्ञांनी नाकारला असतानाही नियम डावलून त्यांना पीएचडी दिली गेली होती. डॉ. हातेकर यांनी हेही प्रकरण चव्हाटय़ावर आणले होते.