शाळांच्या ग्रंथालयांनी या आधीच्या पिढीला वाचनाची गोडी लावली. मात्र, आता शाळांमधील वाचनाची संस्कृती कमी होत असल्याचे समोर येत आहे. ‘असर’च्या पाहणीत शाळांतील ३६ टक्केच विद्यार्थी ग्रंथालयातील पुस्तकांचा वापर करत असल्याचे दिसत आहे.
प्रथम फाउंडेशनतर्फे करण्यात येणाऱ्या ‘असर’ या पाहणीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच किती शाळा शिक्षण हक्क कायद्यातील निकष पूर्ण करतात, खासगी शिकवण्यांची स्थिती काय आहे, पालकांचा खासगी शिकवण्यांकडे ओढा किती आहे अशाही मुद्दय़ांची पाहणी करण्यात आली. गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांमधील वाचनाची गोडी कमी होत चालल्याचे या पाहणीत दिसत आहे. राज्यातील १७.४ टक्के शाळांमध्ये अजूनही ग्रंथालयच नाही. मात्र, ग्रंथालय असलेल्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांचा वाचनाचा उत्साह कमीच असल्याचे दिसते आहे.
ग्रंथालय असलेल्या शाळांमध्येही असरच्या पाहणीच्या दिवशी फक्त ३६.६ टक्केच विद्यार्थी ग्रंथालयांतील पुस्तकांचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.