डॉ. नीरज हातेकर यांच्या निलंबनाच्या कारवाईविरोधात बुधवारी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला. अर्थशास्त्र विभागबरोबरच समाजशास्त्र, राज्यशास्त्र, हिंदी, जर्मन आदी विविध विद्याशाखांच्या ३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळत कलिना येथील विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर तब्बल चार तास धरणे आंदोलन केले.
विद्यार्थ्यांनी आदल्या दिवशीच या आंदोलनाची कल्पना विद्यापीठ प्रशासनाला दिली होती. त्यामुळे, सकाळी साडेआठच्या सुमारास आंदोलन सुरू होण्याआधीच कलिना संकुलाला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले होते. विद्यार्थ्यांनी गोंधळ घालू नये म्हणून विद्यापीठात ठिकठिकाणी पोलीस व्हॅन उभ्या होत्या. विद्यार्थ्यांनी दुपारी साडेबारापर्यंत प्रवेशद्वारावर निदर्शने केली. अर्थशास्त्राबरोबरच इतर विषयाचे विद्यार्थीही या आंदोलनात सहभागी झाले होते. काही प्राध्यापकांनी जाणीवपूर्वक बुधवारी वर्ग घेतले नाहीत. काहींनी तर प्रवेशद्वारावर येऊन आंदोलनाला पाठिंबाही दर्शविला.
तब्बल चार तास धरणे आंदोलन चालल्यानंतर पोलिसांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास विद्यापीठ प्रशासनाच्या विनंतीवरून आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घ्या, अन्यथा जमावबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करू, अशा इशारा दिला. त्यामुळे, विद्यार्थी प्रवेशद्वारावरून उठले. प्रवेशद्वारापासून विद्यापीठाच्या परिसरात मोर्चा काढण्याची तयारी विद्यार्थी करून लागले. इतक्यात तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘फिरोजशहा मेहता भवन’ येथे खुद्द कुलगुरू राजन वेळूकर एका कार्यक्रमासाठी आल्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. म्हणून विद्यार्थ्यांनी आपला मोर्चा तेथे वळविला. या ठिकाणी आधीच पोलिसांचा बंदोबस्त होता. आंदोलनकर्ते विद्यार्थी येत आहेत म्हटल्यावर या ठिकाणी पोलिसांचे कोंडाळे आणखी वाढले. विद्यार्थी भवनाच्या प्रवेशद्वारासमोर बसून घोषणाबाजी करू लागले. आम्हाला कुलगुरूंना भेटून आपली बाजू मांडायची आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. पण, कुलगुरूंनी एकदाही बाहेर येऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली नाही. उलट भवनाचे दरवाजे बंद करून विद्यार्थ्यांना आत येण्यास मज्जाव करण्यात आला.
विद्यार्थी कोणतीही हुल्लडबाजी करीत नसतानाही पोलिसांनी भवनाची दारे लावून घेऊन कुणीही आत जाऊ नये म्हणून बाहेरून कुलूप ठोकले. प्राध्यापकांनाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे, प्राध्यापकांशी पोलिसांची बाचाबाचीही झाली. अरेतुरे करून प्राध्यापकांना आत जाण्यापासून हटकण्यात आल्याने ते चिडले. १५ मिनिटे या ठिकाणी निदर्शने केल्यानंतर आंदोलनकर्त्यांनीही आपला मोर्चा मागे घेऊन आंबेडकर भवनाकडे वळविला. हा सगळा प्रकार सुरू असताना वेळूकर भवनाच्या परिसरातच होते. पण, विद्यापीठाचे नेतृत्व करणाऱ्या वेळूकर यांना मिनिटभरही आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांची बाजू ऐकून घ्यावीशी वाटली नाही. या सगळ्या प्रकाराबद्दल काही शिक्षकांनी मात्र चांगलीच नाराजी व्यक्त केली. ‘विद्यार्थी शांतपणे निदर्शने करीत असताना त्यांच्याशी असे तुच्छतेने वागण्याची गरज काय,’ असा सवाल एका प्राध्यापकाने संतप्त होऊन केला.
या आधी ६ जानेवारीलाही अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करून डॉ. हातेकर यांच्या कारवाईविरोधात विद्यापीठात आंदोलन केले होते. एखाद्या प्राध्यापकांच्या निलंबनासाठी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरण्याची विद्यापीठातील ही तशी दुर्मिळ घटना आहे.
विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे संघटन असलेल्या ‘युनिव्‍‌र्हसिटी कम्युनिटी फॉर डेमॉक्रसी अ‍ॅण्ड इक्वॅलिटी’ (यूसीडीई) या संघटनेनेही विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित निदर्शने केली. या संघटनेतर्फे डॉ. हातेकर यांच्या निलंबनाविरोधात सह्य़ांची मोहीम राबविण्यात येत आहे.

डॉ. माशेलकर यांनी बहिष्कार टाकावा
डॉ. हातेकर यांच्या निलंबनाविरोधात विद्यार्थी-शिक्षकांनी एकत्र यावे यासाठी आम्ही इतर विभागाचे शिक्षक-विद्यार्थी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर १२ जानेवारीला विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभादरम्यान आणखी एक आंदोलन करून आम्ही आमचा असंतोष व्यक्त करू, असे प्रशांत याने आंदोलनाची दिशा स्पष्ट करताना सांगितले. या समारंभाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर उपस्थित राहणार आहेत. त्यांनी डॉ.हातेकर यांच्यावरील कारवाईचा निषेध म्हणून डॉ. माशेलकर यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन विद्यार्थ्यांनी केले आहे.