लातूरच्या अहमदपूर येथील ‘संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर’ शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास हाच ध्यास घेऊन उपक्रम उपक्रम राबविले जातात. नवगतांचे स्वागत, वाढदिवस, सण-उत्सव, नेत्यांची जयंती-पुण्यतिथी, भाषण, वादविवाद, कथाकथन, सामान्यज्ञान, क्रीडा, विज्ञान प्रदर्शन, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, हस्तकला, कार्यानुभव-प्रकल्प प्रदर्शन आदी अनेक उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा विकास साधण्याचे प्रयत्न या शाळेत होत असतात.
नवगतांना शाळेविषयी पहिल्यापासूनच गोडी वाटावी यासाठी नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ आणि चॉकलेट देऊन स्वागत केले जाते. शाळेने विद्यार्थ्यांसाठी संगणक व प्रोजेक्टरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पाढे, कविता, इंग्रजी संभाषणासाठी याचा वापर केला जातो. सांस्कृतिक विभागातर्फे वर्षभराचे नियोजन केले जाते. एक कार्यक्रम एका वर्गाने आयोजित करायचा असतो. म्हणजे त्या कार्यक्रमाच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी तो वर्ग हाताळतो. यात वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन कार्यक्रम आखण्याची जबाबदारी त्या त्या वर्गशिक्षकावर असते.
शाळेत विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचेही अवांतर वाचन वाढावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. ग्रंथालय विभाग प्रत्येक महिन्याला शिक्षकांकडून प्रति ३० रुपये जमा करून एका शिक्षकाच्या आवडीच्या पुस्तकाची खरेदी करतो. त्या शिक्षकाने महिनाभरात या पुस्तकाचे वाचन करावे. शिक्षकांच्या पुढच्या बैठकीत त्या शिक्षकाने संबंधित पुस्तकाचा सारांश काढून त्याचे वाचन करायचे असते. यामुळे शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत राहते व शाळेत चांगल्या पुस्तकांचा संग्रह होतो. शाळेत प्रत्येक शनिवारी परिपाठाऐवजी एका शिक्षकाचे व्याख्यान ठेवले जाते. ते आपल्या आवडीच्या विषयावर किमान ३० मिनिटे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. यामुळे शिक्षकांची वाचनाची आवड वाढते व व्यक्तिमत्त्व विकास होतो.
दिवाळी सुट्टीतील उपक्रम – प्रथम सत्र परीक्षा संपल्यानंतर दिवाळी सुट्टीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांला सुट्टीतील उपक्रमाचे पत्रक दिले जाते व शाळा भरल्यानंतर या उपक्रमातील निवडकर चित्र, प्रकल्प फाइल, कार्यानुभवाच्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन भरविले जाते.
संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा – विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालण्यासाठी दरवर्षी राबविला जाणारा हा उपक्रम शाळेचे वैशिष्टय़ आहे. यात सकाळी ग्रंथदिंडीचे आयोजन केले जाते. विद्यार्थी वारकरीच्या वेशात तर विद्यार्थिनी साडी नेसून डोक्यावर कलश घेऊन सहभागी होतात. त्यानंतर शाळेत विज्ञान प्रदर्शन भरविले जाते.
बातमी वाचन – विद्यार्थ्यांनी अभ्यासाशिवाय अवांतर वाचन करावे यासाठी दररोज वर्तमानपत्र वाचून आवडलेल्या चांगल्या पाच बातम्या सुंदर हस्ताक्षरात लिहावयास सांगितले जाते. मग या बातम्यांचे वर्गात वाचन केले जाते. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना दिवसभरातील नऊ तासांचे अहवाल वाचन करायला लावले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांची उजळणी होते.
वर्ड्स अल्बम – इंग्रजी भाषेविषयीची भीती दूर व्हावी यासाठी प्रत्येक इयत्तेनुसार विद्यार्थ्यांना शब्दांचा संग्रह करायला लावला जातो. त्याला वर्ड्स अल्बम हे नाव दिले आहे. हे शब्द विद्यार्थ्यांनी पाठ करायचे असतात. ज्या विद्यार्थ्यांचे सर्वात जास्त शब्द पाठ करून होतील त्यांना किंग ऑफ वर्ड्स हा पुरस्कार दिला जातो. मुलांनी दप्तर चांगले ठेवावे यासाठी प्रत्येक वर्गातून ‘दप्तराचा राजा’ आणि ‘दप्तराची राणी’ हे पुरस्कार दिले जातात.
आजी-आजोबा दिन – विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आजी-आजोबांचे स्थान कमी होऊ नये म्हणून व संस्कारांचा भाग म्हणून हा दिन साजरा केला जातो. त्या दिवशी आजी-आजोबांवर निबंध, भाषण, स्वरचित काव्यवाचन व नाटक स्पर्धा घेतल्या जातात. सर्वच आजी-आजोबांना निमंत्रित करून त्यांचा सत्कार केला जातो.
वाचनालय – आठवडय़ातील कार्यानुभवाचे दोन तास वाचनालयाला दिले जातात. शाळेच्या वाचनालयात किमान ४०० पुस्तके उपलब्ध आहेत. रद्दीतून वाचनालय ही संकल्पना राबविली जाते. वर्तमानपत्रातील बोधकथांचा, शब्दकोडी, थोर व्यक्तींवरील लेख, शास्त्रज्ञांवरील माहिती संग्रहित करून त्याचे पुस्तक तयार केले जाते आणि त्याचा वाचनालयासाठी उपयोग केला जातो.
शाळेचा प्रत्येक विद्यार्थी उत्तम नागरिक म्हणून समाजात वावरला पाहिजे, या दृष्टीने संस्कार रुजविण्याचे काम शाळेत केले जाते. या उपक्रमांना विद्यार्थी-शिक्षकांबरोबरच पालकांचीही मदत लाभत असल्याने शाळेच्या या प्रयत्नांना यशही येत आहे.
– आशा तत्तापूरे
मुख्याध्यापक
संपर्क – ९७६५५८८२३७

कप्पेबंद, साचेबंद वाटांनी न जाता आमच्यातलेच काही शिक्षक वेगळ्या वाटा चोखळताना दिसतात. आपलं शिकणं हे जगण्याचा भाग बनविताना दिसतात. हसतखेळत, मुलांच्या कलानं जाणारं हे शिक्षण दीर्घकाळ टिकतं. मुलांना जगायला शिकवतं आणि जीवन संजीवनी पुरवतं, असा अनुभव आहे. तुमच्या शाळेतही ‘असे चिरंतन शिक्षण’ देणारे  उपक्रम सुरू असल्यास आम्हाला जरूर कळवा. उपक्रमांची माहिती पाठविताना छायाचित्रेही जरूर पाठवावी.
संपर्कासाठी पत्ता : ‘चिरंतन शिक्षण’ लोकसत्ता, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१. दूरध्वनी- ६७४४००००. फॅक्स-२२८२२१८७  
reshma.murkar@expressindia.com,  reshma181@gmail.com

design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Nashik Education Department, Steps Up Efforts, Increase Voter, Turnout Through SVEEP Initiative, Systematic Voters Education and Electoral Participation program, students,
उन्हाळी सुट्टीतही एसव्हीईईपी उपक्रमासाठी धडपड
Two minor girls molested in a private tutoring class in nashik
नाशिक : खासगी शिकवणी वर्गात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग